वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्याच्या पाळोदी येथील अल्पभूधारक शेतकरी गोवर्धन सुखदेव आठवले यांच्या मालकीच्या बकऱ्यांपैकी एका बकरीने पाचव्यांदा पाच पिल्लांना जन्म दिला आहे.
शेतीसोबत जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी व शेतमजूर कुक्कुटपालन, शेळीपालन, तसेच गायी-म्हशींचे पालन करून उदरनिर्वाह करीत असतात. विशेषतः शेळीपालन व्यवसाय अधिक फायदेशीर ठरत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल या व्यवसायाकडे वाढत आहे.
पाळोदी येथील गोवर्धन सुखदेव आठवले यांच्याकडे देखील चार एकर शेती असून, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी गायी व म्हशींचे पालन सुरू केले. मात्र, त्यातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी शेळीपालनाकडे लक्ष दिले.
सुरुवातीला त्यांनी चार-पाच शेळ्यांपासून व्यवसायाला सुरुवात केली, आणि आज त्यांच्याकडे तब्बल ३० ते ३५ शेळ्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या मालकीच्या एका बकरीने पाचव्यांदा पाच पिल्लांना जन्म दिला आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहल आहे.
हेही वाचा : पशुसंवर्धन विभागाने दिला महत्वाचा सल्ला; 'अशी' घ्या जनावरांची उन्हाळ्यात काळजी