गायीच्या दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आला असून दुधाची दरवाढ करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
बनकिन्होळ्यासह परिसरातील बाभूळगाव बु, भायगाव, चिंचखेडा, वरखेडी, निल्लोड, कायगाव, गेवराई सेमी, भवन, तलवाडा, गव्हाली, टाकळी जिवरग आदी परिसरातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. परंतु मागील काही दिवसांपासून शासनाने दुधाचे भाव कमी केले आहेत. यामुळे दूध व्यवसायकरणे परवडत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे जनावरांचे खाद्य खूप महागले आहे. तर दुसरीकडे गायीच्या दुधाला ३५ रुपये लिटर मिळणारा दर आता तीन महिन्यांपासून केवळ २३ रुपये व आता २५ रुपये मिळत आहे. यामुळे लागत खर्च व उत्पादन खर्चाचा मेळ लागत नसून हा धंदा तोट्यात आल्याने शेतकरी खूप त्रस्त झाले आहेत.काहींनी तर गायी विकून धंदा बंद केल्याचेही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. एकीकडे दुग्ध व्यवसाय तोट्यात आला असताना कापूस, मका, सोयाबीन, तूर आदी शेतमालाला ही भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे शासनाने दुधाला व शेतमालाला भाव वाढवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ जमेना
•शेतकरी दोन पैसे हातात राहावे व कुटुंबाला हातभार लागावा, याकरीता शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय करतात. यात दुधाला जर चांगला भाव असेल, तर पैसे उरतात, नाहीतर हा धंदा तोट्यात जातो.
• एका गायीला दररोज सकाळ, संध्याकाळ ४ किलो पशुखाद्य (ढेप) लागते. ते ३५ रुपये किलोप्रमाणे १४० रुपये होतात. सध्या महागल्याने चारा, मुरघास अडीचशे रुपयांचा लागतो.
• म्हणजे ३९० रुपयांपर्यंत खर्च येत आहे. विशेष म्हणजे यात पशुआरोग्यावर येणारा खर्च तसेच शेतकऱ्याची मेहनत समाविष्ट केलेली नाही.
• यात सदर गाय दिवसाला जर १५ लिटर दूध देत असेल, तर २५ रुपये भावाने ३७५ रुपये शेतकऱ्यांना मिळतात. यामुळे या व्यवसायात शेतकऱ्याच्या हाती भोपळा राहत असल्याचे दिसत आहे.