अरूण बारसकरसोलापूर : सहकारी कारखानदारी सतत अडचणीत असताना खासगी कारखान्यांची मोठ्या प्रमाणावर उभारणी व खासगी कारखाने सक्षमपणे सुरू आहेत. तीच स्थिती गावोगावच्या दूध संस्थांची झाली असून, जिल्हा दूध संघाकडे अवघ्या २५ दूध संस्था दूध पुरवठा करीत आहेत.
सहकारी दूध संघ अडचणीत आल्याने गावपातळीवरील दूध संस्थांही मोडीत निघाल्या आहेत. खासगी दूध संस्था मात्र जोमात सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात जवळपास चार लाख लिटरपेक्षा अधिक दूध सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाकडे संकलन होत असे, त्यावेळी जिल्ह्यातील सहकारी दूध संस्थांची संख्या तीन हजारांपर्यंत होती.
एका गावात अनेक दूध संस्था या सहकारी होत्या व त्या सोलापूर जिल्हा दूध संघाला दूध पुरवठा करीत असायच्या. जिल्ह्यात उत्पादित दूध सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ व अकलूजच्या शिवामृत दूध संघालाच प्रामुख्याने शेतकरी पुरवठा करीत असत. त्यानंतर जिल्ह्यात वरचेवर दूध संकलनात वाढ होत गेली.
अलीकडे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दूध संस्था असून, अनेक गावांत आठ ते १० व त्यापेक्षा अधिक दूध संस्था आहेत. दूध संस्थांची संख्या मोठी असली तरी त्या संस्था खासगी आहेत. त्यामध्ये अनेक गावांत एखादीच सहकारी संस्था आहे.
कुठे तरी असलेली एखादी दूध संस्थांही आता बंद पडणार असून, संकलन केलेले दूध जिल्हा दूध संघाच्या अवस्थेमुळे इतरत्र घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच ऑगस्ट महिन्याच्या १० तारखेपर्यंत संघाला दूध पुरवठा करणाऱ्या ११० पैकी आता २५ दूध संस्था उरल्या आहेत.
पाच तालुक्यांत २५ संस्था● सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे सात हजार लिटरपर्यंत दूध संकलन होत आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील १५ दूध संस्थांचे केगाव येथे तर माढा व मोहोळ तालुक्यातील १० दूध संस्थांचे दूध वाहनाने केगाव येथील शीतकरण केंद्रावर पोहोच केले जात असल्याचे सांगण्यात आले.● मागील वर्षी सोलापूर जिल्हा दूध संघाला साधारण अडीचशे दूध संस्था दूध पुरवठा करीत होत्या. ती संख्या १० ऑगस्टपर्यंत ११० वर आली होती. आता दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांची संख्या २५ पेक्षाही कमी झाली असल्याचे सांगण्यात आले.● जिल्ह्यातील १० तालुक्यांतील सहकारी दूध संस्थांना घरघर लागली असली तरी माळशिरस तालुक्यातील शिवामृत दूध संघामुळे त्या तालुक्यातील दूध संस्था टिकून आहेत. या ही तालुक्यातील सहकारी दूध संस्थांवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले.