सदानंद औंधे
मिरज : जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दोन लाखाने वाढले आहे. वर्षभरात दैनंदिन सरासरी १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे चार महिने दुधासाठी पुष्ठकाळ मानले जातात. यावर्षी पुष्ठकाळात जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दहा ते पंधरा टक्क्याने वाढले आहे.
जिल्ह्यात दररोज होणाऱ्या सुमारे १५ लाख लीटर दूध संकलनापैकी ५० टक्के पिशवीबंद दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची निर्यात व दूध पावडर व बटर या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वापर होतो.
पावसाळ्यानंतर चार महिन्यांच्या काळात हिरवा चारा उपलब्ध असल्याने उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. यावेळीही उत्पादन वाढल्याने दूध उत्पादन दैनंदिन १७ लाख लीटर वर पोहोचले असल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभाग कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते.
यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यात दैनंदिन १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दूध उत्पादन १७ लाख लीटरपर्यंत गेले आहे. पुरेशा पावसाने चारा उपलब्ध असल्याचा हा परिणाम आहे.
जिल्ह्यात चितळे, थोटे आदी १२ खासगी दूध डेअऱ्या, १७ मल्टीस्टेट दूध संघ दूध संकलन करतात. खासगी डेअऱ्यांचे दररोज १२ लाख लीटर दूध संकलन असून त्यापैकी एकट्या चितळे डेअरीचे दररोज ८ लाख लीटर संकलन आहे.
अनुदान योजना केली बंद
शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लीटर ५ व सात रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाकडील ४० हजार दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर अनुदान पाठविण्यात येत होते. जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यासाठी दूध उत्पादकांसाठी अनुदान योजना होती. योजना नोव्हेंबरपासून बंद करण्यात आल्याने खासगी व सहकारी दूध संघांनी दूध दरात कपात करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील दूध उत्पादन
ऑगस्ट : १६,२४,२९८
सप्टेंबर : १६,९०,९७७
ऑक्टोबर : १७,१६,०८५
अधिक वाचा: Dudh Dar : गोकुळ व वारणाच्या गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात