Join us

जनावरांच्या चाऱ्यासाठी मुरघासला प्रचंड मागणी, हिरवा मका ठरतोय चांगला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 10:35 AM

चारा साठविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग...

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शेतकरी शेतीला पर्यायी जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाकडे वळले असून, विक्रमी दूध संकलन करीत आहेत. त्यामुळे वर्षभरासाठी जनावरांना चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून ऐन उन्हाळ्यापाठोपाठ आता पावसाळ्यातही जनावरांचा चारा साठविण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे मिळेल तेथून हिरवा मक्याचा चारा खरेदी करून त्याचे रूपांतर मुरघासात करून ठेवण्याला प्राधान्य दिले जात आहे.

शिरपूर तालुक्यात मुरघासासाठी लागणाऱ्या हिरव्या मक्याच्या पिकाला प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांनाही अगदी तीन ते चार महिन्यांत चांगले उत्पन्न मिळते. कंपनीचा मुरघास हा सहा ते सात हजार रुपये प्रतिटन मिळतो, तर शेतकऱ्यांकडील हिरवी मका दोन हजार रुपये प्रति टन घेऊन कुट्टी केली जाते. पॅकिंगसाठी लागणाऱ्या बॅगचा खर्च ६०० रुपये, मक्याचा चारा कुट्टी मशीनद्वारे करून भरून देण्याचा खर्च ९०० रुपये येतो. एक टन मक्याची कुट्टी भरण्यासाठी पशुपालकांना ३ हजार ५०० रुपये टनासाठी खर्च येतो.

सध्या अनेक शेतकरी मक्याचे पीक जनावरांच्या चाऱ्यासाठी घेऊ लागले आहेत. वर्षातून तीन वेळा या पिकाचे उत्पन्न निघते. दर तीन महिन्याला एकरी २५ ते ३० टनांहून अधिक उत्पादन हिरव्या मक्याच्या चाऱ्याचे मिळते. कमी खर्चात एका वर्षात एक लाखाच्या आसपास आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.

मुरघासचे फायदे

  • जनावराची भूक वाढल्यामुळे मुरघास जास्त खातात. वाया घालवत नाहीत. कारण तो रुचकर, स्वादिष्ट असतो.
  • वाळलेल्या चायाच्या तुलनेत मुरघासची पौष्टिकता उत्तम असते. मुरघासाकरिता चारा पिकाची कापणी फुलोरा अवस्थेत केली जात असल्यामुळे जास्तीत जास्त अन्नदव्ये चाऱ्यामध्ये येतात.
  • ​​​​​​​मुरघासमुळे जनावरांच्या पचनक्रियेत वाढ होऊन दुधोत्पादन वाढते.
टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीचारा घोटाळा