राजाराम लोंढे
कोल्हापूर : 'गोकूळ' दूध संघाच्या प्रयत्नातून 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकारातून केर्ली (ता. करवीर) येथे सुरू केलेल्या जातिवंत म्हशींच्या गोठ्यातून गेल्या महिन्याभरात २४ 'मुऱ्हा' जातीच्या म्हशींची विक्री झाली आहे.
चार-पाच दिवस दुधाची खात्री झाल्यानंतरच शेतकरी म्हैस खरेदी करत असल्याने फसवणूक होत नाही. परिणामी 'हरियाणा', 'गुजरात' येथील गोठ्यावर जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
गुजरात, हरियाणा, पंजाब येथून 'मुऱ्हा', 'जाफराबादी', 'मेहसाणा' या जातीच्या म्हशी खरेदीसाठी शेतकरी परराज्यात जात होते. तेथे जाण्याचा खर्च, वेळ, जनावरांच्या वाहतुकीसाठी द्यावे लागणारे पैसे आणि होणाऱ्या फसवणुकीमुळे काही वेळा शेतकरी अडचणीत येत होते.
'गोकूळ' दूध संघाने पुढाकार घेऊन जिल्ह्यातच जातीवंत म्हैस शेतकऱ्यांना मिळाली तर त्याचा खर्च, वेळ वाचेल आणि फसवणूकही होणार नाही.
यासाठी, एनडीडीबीच्या सहकार्याने ११ ऑक्टोबरला केर्ली येथे जातीवंत म्हशींचा गोठा सुरू केला आहे. महिन्याभरात येथून २४ म्हशींची विक्री झाली आहे. या सगळ्या म्हशी 'मुऱ्हा' व 'मुऱ्हा क्रॉस' जातीच्या आहेत.
'जाफराबादी'पेक्षा 'मुऱ्हा' लाच पसंती
शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच म्हशी उपलब्ध करून देतात. कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण आणि चारा पाहता पहिला किंवा दुसऱ्या वेताच्या 'मुऱ्हा' म्हशीलाच येथील शेतकऱ्यांची पसंती आहे. 'जाफराबादी', 'मेहसाणा' म्हशींना अद्याप तरी मागणी नाही.
दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबून त्यांना कमी पैशात जातिवंत म्हैस मिळावी, यासाठी 'गोकूळ'चा प्रयत्न आहे. गेल्या महिन्याभरात चांगला प्रतिसाद मिळाला असून, दूध उत्पादनातही वाढ होत आहे. - डॉ. प्रकाश साळुंखे, पशुसंवर्धन विभाग प्रमुख, गोकूळ