सन २०२१-२२ या वर्षात एकूण स्थूल उत्पादनामध्ये ४.११% च्या एकूण योगदानासह पशुधन क्षेत्राने भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. सन २०१२ - २०१९ या कालावधीत भारतातील पशुधनाच्या संख्येमध्ये १% वाढ झाली असली तरी, गेल्या पशुगणनेच्या तुलनेत एकूण देशी पशुसंख्येत ६%ची घट झाली आहे. महाराष्ट्राची एकूण पशुसंख्या १३.९ दशलक्ष आहे, जी मागील पशुगणनेच्या तुलनेत १०% ने कमी झालेली आहे. महाराष्ट्रातील डांगी, देवणी, गवळाऊ, खिल्लार आणि लाल कंधारी या गोवर्गीय नोंदणीकृत जातीच्या पशुधन संख्येचा कमी होत असलेला कल दर्शवित असुन, ही एक चिंताजनक बाब आहे. या जातींशिवाय, गिर, साहिवाल, थारपारकर यांसारख्या उच्च जनुकीय गुणवत्तेच्या इतर भारतीय गोवर्गीय जातींची पशुधन संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे.
MOET (मल्टीपल ओव्हुलेशन ॲन्ड एंब्रियो ट्रान्सफर) आणि OPU IVF (ओव्हम पिक अप- इनव्हिट्रो फर्टिलायझेशन) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे निवडक प्रजनन केले जाते. व त्याव्दारे उच्च प्रतीच्या/वंशावळीच्या पशुधनाच्या संख्येत वाढ करणे शक्य होते. या तंत्रज्ञानाची सेवा शेतकऱ्यांच्या दारात उपलब्ध करुन दिल्यास देशी गायी आणि म्हशींच्या मौल्यवान जातींच्या पशुधनाच्या संख्येत जलद गतीने वाढ होण्यास मदत होईल.
उपरोक्त पार्श्वभूमीवर बाहयफलन व भृणप्रत्यारोपण या तंत्रज्ञानाच्या मदतीने (OPU-IVF ET) अधिक गतीने उच्च अनुवंशिक गुणधर्म असणाऱ्या जास्त कालवडींची पैदास करण्यासाठी सदर तंत्रज्ञानाचा सर्रास वापर करणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन नामशेष होत असलेल्या गोवर्गीय जातीचे संवर्धन करणे शक्य होणार आहे. या व्यतिरिक्त, IVF साठी लिंगविनिश्चित वीर्य वापरून पूर्वनिर्धारित लिंग असलेली पैदास करणे शक्य आहे.
उच्च उत्पादक क्षमता असलेली गाय तिच्या आयुष्यात फक्त ८-१२ वासरांना जन्म देवू शकते. याच गाईमध्ये भृणप्रत्यारोपण तंत्रज्ञान अवलंबिल्यास अशा गायींपासुन एका वर्षात अंदाजे ८ ते १० वासरे आणि तिच्या आयुष्यात अंदाजे ५० ते ६० वासरांची पैदास सरोगेट मदर मार्फत करणे शक्य आहे. या तंत्रज्ञानाव्दारे निर्मिती केलेले भृण उणे १९६ अंश सेल्सियस तापमानाला द्रवनत्रात गोठीत अवस्थेत अनेक वर्ष साठविता येतात.
महाराष्ट्रातील स्थानिक वंशावळीच्या गायी/म्हशींच्या संख्येत होणारी घट विचारात घेऊन, त्यांच्या उत्पादकतेत वाढ करुन सदर वंशावळीचे संवर्धन करण्यासाठी OPU IVF आणि ET या आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करणे क्रमप्राप्त ठरते.
तदनुषंगाने राज्यातील प्रत्येक महसुली विभागात ०१ या प्रमाणे एकुण ०६ भृण प्रत्योरापण प्रयोगशाळांची स्थापना करण्यास दि. १६ सप्टेंबर, २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली असून, त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. सन २०२३-२४ मध्ये राज्यातील प्रत्येक महसुली विभागासाठी खालील प्रमाणे ०६ भृण प्रत्योरापण प्रयोगशाळांची स्थापना करण्यास याव्दारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र | महसुली विभाग | भृण प्रत्योरापण प्रयोगशाळा स्थापन करण्याचे ठिकाण |
१ | मुंबई | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, पेण, जि. रायगड |
२ | नागपूर | पशुपैदास प्रक्षेत्र, हेटिकुंडी, ता. कारंजा, जि. वर्धा |
३ | पुणे | वळूमाता प्रक्षेत्र ताथवडे, पुणे |
४ | औरंगाबाद | वळू संगोपन केंद्र, औरंगाबाद (हर्सुल) |
५ | नाशिक | लोणी बुद्रुक, ता. राहता, जि. अहमदनगर |
६ | अमरावती | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, अकोला |
सदर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर या संस्थेमार्फत सन २०२३-२४ पासून करण्यात येणार आहे.