Join us

Shepherds Upliftment in Maharashtra : राज्यातील मेंढपाळांच्या उन्नतीसाठी घेतले हे मोठे निर्णय.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 11:38 AM

Shepherds Upliftment in Maharashtra : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी ६६ कोटी ८५ लाख रुपये निधी देण्यात येत आहे.

राज्यात मेंढीपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” पुढे सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे कामकाज सक्षम होण्यासाठी पुणे येथे सुसज्ज मुख्य प्रशासकीय भवन उभारण्यात येईल असे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

महामंडळाच्या ६ क्षेत्र बळकटीकरणबाबत आढावा बैठक मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. शितल कुमार मुकणे, उपसचिव निवृत्ती मराळे यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेस गती देण्यात येत आहे. महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय भवन उभारणीसाठी सुधारित आराखडा तयार करण्यात यावा.

प्रशिक्षण केंद्रासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जागा निश्चित केली आहे. तेथे प्रशिक्षणार्थी मेंढपाळ यांच्यासाठी वसतीगृह असलेले प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल, कामाबाबत नियोजन करून सर्व प्रक्षेत्रही त्या-त्या विभागातील जातिवंत शेळ्या मेंढ्यांसाठी विकास केंद्र व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी ६६ कोटी ८५ लाख रुपये निधी देण्यात येत आहे.

यामध्ये मुख्यालयासह रांजणी, जि. सांगली, महूद, जि. सोलापूर, दहिवडी, जि. सातारा, पडेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर, बिलाखेड, जि. जळगाव, अंबेजोगाई, जि. बीड, तीर्थ, जि. धाराशिव, मुखेड, जि. नांदेड, बोंद्री, जि. नागपूर, पोहरा, जि. अमरावती प्रक्षेत्रचा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व विकासकामांचा समावेश केला आहे.

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित होणाऱ्या लोकरीवरती प्रक्रिया करून त्यापासून विविध लोकर वस्तू तयार करण्यासाठी लोकर प्रक्रिया केंद्र स्थापन करून यामधून मेंढपाळांना रोजगार उपलब्ध होणे शक्य आहे. त्यासाठी केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करून प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मेंढपाळांची भटकंती थांबून त्यांना एका ठिकाणी स्थिर करून त्यांची आर्थिक व सामाजिक उन्नती करण्यासाठी भागीदारी तत्त्वावर पोहरा (जि.अमरावती) येथील प्रक्षेत्रावर अर्धबंदिस्त मेंढीपालन करण्यासाठी चा प्रायोगिक तत्त्वावरचा प्रकल्प राबवण्यासंदर्भात बैठकीमध्ये निर्देश श्री. विखे-पाटील यांनी दिले.

राज्यामध्ये बहुतांश मेंढपाळ हे भटकंती करून आपला व्यवसाय करतात. अपुरे कुरण क्षेत्र व पडीक जमीन यामुळे त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे त्यामुळे चराऊ कुरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल विभाग व वन विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :शेळीपालनसरकारराज्य सरकारराधाकृष्ण विखे पाटीलदूध