Join us

चाराटंचाईला तोंड देण्यासाठी हा चारा देतोय दुग्धव्यवसायाला संजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 10:45 AM

चालू वर्षी कमी पावसामुळे भूजल पातळी खालावल्यामुळे चाराटंचाईला तोंड देण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. शेतकऱ्यांनी ऐनवेळी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन लाखो रुपये खर्च करून मुरघासाच्या चाऱ्याची तयारी करून ठेवली आहे.

चालू वर्षी कमी पावसामुळे भूजल पातळी खालावल्यामुळे चाराटंचाईला तोंड देण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. शेतकऱ्यांनी ऐनवेळी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन लाखो रुपये खर्च करून मुरघासाच्या चाऱ्याची तयारी करून ठेवली आहे.

जिरायती भागात अनेक शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. परंतु, पशुपालन करत असताना चारा व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा विषय आहे कारण चारा व्यवस्थापनावरच या व्यवसायाच्या फायदा-तोट्याचे गणित आहे.

त्यासाठी वर्षभर पुरेल असं चारा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, यामध्ये हिरवा चारा, वाळलेला चारा अशा पद्धतीने वर्गीकरण करून त्याचे व्यवस्थापन करता येते. वाळलेला चारा आपण वर्षभर सहजरीत्या साठवण करून ठेवू शकतो, परंतु हिरवा चारा वर्षभर पुरेल अशा पद्धतीने त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

यामध्ये पाण्याची उपलब्धता असणाऱ्या भागात शेतकरी वर्षभर हिरवा चारा जनावरांसाठी उपलब्ध करतात. विशेषतः उन्हाळ्यात जिरायती भागात चाऱ्याची कमतरता जाणवते. याला पर्याय म्हणून मुरघास करणे योग्य ठरू शकते. मुरघास हा वर्षभर टिकू शकतो.

मुरघास म्हणजे हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून त्यामध्ये कल्चर, गूळपाणी किंवा मीठ असे वेगवेगळे मिश्रण कुट्टीमध्ये एकत्र करतात. त्याला हवा विरहित किंवा हवाबंद जागेत साठवण करून ठेवणे. आपल्याला गरज लागेल त्यावेळी हा चारा जनावरांसाठी उपयुक्त ठरतो.

मुरघासासाठी मका, कडवळ, बाजरी ही सर्व पिके मुरघास करण्यासाठी सर्वांत जास्त योग्य समजली जातात. यामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते. तसेच, उसाचे वाढे देखील मुरघास बनवण्यासाठी वापरणे शक्य आहे.

मुरघास साठवणीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. यामध्ये बॅगांचा वापर केला जातो, ५० किलोपासून तीन टनांपर्यंत बेंग मिळतात. बॅगमध्ये मुरघास भरण्याअगोदर त्याला आतून प्लास्टिक बॅग वापरली जाते. दुसरी पद्धत म्हणजे खड्डा पद्धत. यामध्ये जमिनीत खड्डा खोदून त्याला शेततळ्याचा कागद वापरून त्यामध्ये मुरघास साठवता येतो.

तिसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला जमिनीच्या वरती हवाबंद असे बांधकाम करून त्यामध्ये मुरघास करता येतो. चौथी पद्धत म्हणजे बेलर किंवा गठ्ठे पद्धत यामध्ये मशीनमध्ये मक्याची कुट्टी भरून त्याची मशीनच्या आधारे दाब देऊन गठ्ठे बनवले जातात व त्याला प्लास्टिक पेपरच्या साहाय्याने गुंडाळले जाते, परंतु ही पद्धत जास्त खर्चिक असते.

काही वेळा मुरघास तयार करताना त्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यासाठी मुरघास तयार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, तसेच जनावरांना आहार देताना बुरशीचा धोका टाळण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन त्यात विशिष्ट पावडर मिसळावी.

मुरघास गाय व म्हैस, शेळी आणि मेंढीला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार द्यावा. हा चारा दिवसातून २ ते ३ वेळा द्यावा. दुधाळ जनावरांना हा चारा धारा काढल्यानंतर द्यावा. मुरघास अवघ्या ४० ते ५० दिवसांत तयार होतो, आणि तो पुढील ५ ते ६ महिने वापरता येतो.

त्यामुळे शेत पुढील पिकासाठी मोकळे होते. उन्हाळी हंगामात देखील जनावरांना सकस आणि हिरवा चारा देता येतो. उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना हा उत्तम पर्याय आहे. दुष्काळी भागात देखील उन्हाळी हंगामात जनावरांना हिरवा चारा देता येतो.

अधिक वाचा: उन्हाळ्यातही दुध उत्पादन कमी होणार नाही.. दुभत्या जनावरांची अशी घ्या काळजी

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधगायशेतकरीशेतीपाणीकपात