Join us

राज्यात दुधाला सर्वाधिक दर देणारा हा दूध संघ शेतकऱ्यांना देणार १३६ कोटींचा फरक; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:32 IST

'गोकुळ' दूध संघाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात दूध पुरवठा केलेल्या म्हैस व गाय दुधासाठी अंतिम दूध दर फरक निश्चित केला असून, त्याची रक्कम तब्बल १३६ कोटी रुपये होत आहे.

कोल्हापूर : 'गोकुळ'दूध संघाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात दूध पुरवठा केलेल्या म्हैस व गाय दुधासाठी अंतिम दूध दर फरक निश्चित केला असून, त्याची रक्कम तब्बल १३६ कोटी रुपये होत आहे.

मागील आर्थिक वर्षापेक्षा शेतकऱ्यांना २२ कोटी ३७ लाख रुपये जादा देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली.

अध्यक्ष डोंगळे म्हणाले, दूध उत्पादन वाढवत असतानाच काटकसरीचा कारभार केल्यानेच संघाचा यंदा व्यापारी नफ्यात मोठी वाढ झाली.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने यंदा हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त दरफरक प्रतिलिटर २० पैसे दूध उत्पादकांना जादा देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याशिवाय दूध फरकावरील व्याज, डिबेंचर्स व्याज, लाभांश, असे १३६ कोटी ३ लाख रक्कम दूध संस्थांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

म्हैस दुधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे व गाय दुधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ४५ पैसे याप्रमाणे दूध उत्पादकांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे.

मिनरल मिक्स्चरच्या माध्यमातून ७ कोटीसंघाचे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत दूध उत्पादकांना पशुखाद्यासोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्स्चरच्या ४ लाख ७३ हजार ५४२ इतक्या बॅग्ज मोफत दिल्या. त्याची किंमत ७ कोटी १० लाख ३१ हजार ३०० इतकी होते.

कर्मचाऱ्यांनाही केले खुशदूध उत्पादकांना प्रतिलिटर २० पैसे जादा देत असताना 'गोकुळ' ने कर्मचाऱ्यांनाही खुश केले आहे. कर्मचाऱ्यांना २ टक्के जादा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

उच्चांकी दर देणारा संघगेल्या आर्थिक वर्षात म्हैस दूध उत्पादकांना अंतिम दूध दर फरकासह सरासरी प्रतिलिटर ६०.४८ रुपये, तर गाय दूध उत्पादकांना ३६.८४ रुपये दिला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना एवढा दर देणारा 'गोकुळ' हा एकमेव संघ आहे.

अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :गोकुळदुग्धव्यवसायशेतकरीदूधगायकोल्हापूरदूध पुरवठाबँक