कोल्हापूर : 'गोकुळ' दुधाचा १६ मार्च, १९६३ ते २०२४ हा दिमाखदार प्रवास असून, जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम 'गोकुळ'ने केले आहे.
हिरकमहोत्सवी वर्षाचा आज, शनिवारी दुपारी दोन वाजता अमृतसिद्धी हॉल, कळंबा येथे सांगता समारंभ असून, यावेळी दूध उत्पादकांचा गौरव होईल.'गोकुळ'चे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या अविरथ प्रयत्न आणि एन.टी. सरनाईक यांच्या मिळालेल्या साथीमुळे 'गोकुळ'चा पाया भक्कम झाला.
प्रारंभी १६ मार्च, १९६३ रोजी २२ संस्था आणि ७०० लिटर दूध संकलनावरून संघाचा प्रवास सुरू झाला, तत्कालीन नेतृत्वाने श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचा विस्तार केला. आज, संघाची प्रतिदिनी १७ लाख लिटर दूध हाताळणी क्षमता व दूध पावडर निर्मिती आहे.
दहा दिवसाला ७० कोटी दूध बिल
दर दहा दिवसाला ७० कोटींहून अधिक दूध बिल दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणारा 'गोकुळ' एकमेव दूध संघ आहे. संघाची वार्षिक उलाढाल साडेतीन हजार कोटी असून, वीस लाख लीटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्याच्या ध्येयाने काम सुरु आहे.
दृष्टिक्षेपात 'गोकुळ'
• वार्षिक उलाढाल ३,४२८ कोटी
• अधिकृत भाग भांडवल - १०० कोटी
• वसूल भाग भांडवल - ६१.६४ कोटी
• राखीव इतर निधी- ३७०.५७ कोटी
• गुंतवणूक - २७४.७४ कोटी
• कायम मालमता - २६३ कोटी
• निव्वळ नफा ९.१९ कोटी
• एकूण दूध संकलन ४७.४४ कोटी लिटर
• दूध दर फरक १०४ कोटी रु. अंतिम
• प्रतिदिनी सरासरी संकलन १५ लाख लिटर
दूध उत्पादक शेतकरी हा 'गोकुळ'चा कणा असून, ग्राहकांच्या विश्वासावर आज देशपातळीवर संघाने दबदबा निर्माण केला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताचा कारभार सुरू असून, एकूण उत्पन्नातील ८२ टक्के रकमेचा परतावा देण्याची परंपरा कायम राखली आहे. सर्वांच्या सहकार्यावर लवकरच २० लाख लिटर दुधाचा टप्पा यशस्वीपणे निश्चित पार करू. - अरुण डोंगळे (अध्यक्ष, गोकुळ)