मारवेल गवत, ज्याला कांडी गवत असेही म्हटले जाते. मारवेल हे एक गवतवर्गीय चारा पिक आहे. मारवेल गवत शेतकऱ्यांना उच्च गुणवत्ता असलेला हिरवा चारा उपलब्ध करून देण्यास मदत करते.
पाणी असलेल्या भागात या गवताची लागवड अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तसेच शेताच्या बांधावरही याची लागवड केली जाते. एकदा लागवड केल्यास या गवताचे उत्पादन सलग ४ ते ५ वर्षे मिळत राहते.
लागवडीची योग्य वेळ आणि वातावरण
मारवेल गवताच्या लागवडीसाठी उष्ण व दमट वातावरण आवश्यक आहे. सरासरी तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस असावे लागते. पाऊस सुरू झाल्यानंतर, जमिनीत वाफसा स्थिती निर्माण झाली की, या गवताची लागवड करण्याची योग्य वेळ असते. यामुळे गवताच्या वाढीस मदत मिळते आणि उत्पादन जास्त होते.
लागवडीची पद्धत
मारवेल गवताच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन उत्तम असते. चारा उत्पादनासाठी एकरी १५,००० ते २०,००० ठोंब्यांची आवश्यकता असते. नवीन लागवड जून-जुलै महिन्यात केली जाते. ठोंबे ४५ x ३० सेंटीमीटर अंतरावर लावावेत. ज्यामुळे गवताची चांगली वाढ होते आणि उत्पादन अधिक मिळते.
वाणाची निवड
चांगला चारा उत्पादनासाठी पारंपरिक वाणांऐवजी सुधारित वाणांचा वापर करणे आवश्यक आहे. ज्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विकसित 'फुले मारवेल-०६-४०' आणि 'फुले मारवेल-०१' या वाणांची लागवड केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. सुधारित वाणांच्या लागवडीने चारा उत्पादनात सुधारणा होते आणि शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळतो.
बहुवार्षिक पिकांचे फायदे
मारवेल गवत हे बहुवार्षिक पिक आहे, म्हणजेच एकदा लागवड केल्यावर ३ ते ४ वर्षे नियमित चारा उत्पादन मिळते. यामुळे शेतकऱ्यांना हंगामी पिकांची नांगरणी, कोळपणी इत्यादी कामांमध्ये खर्चाची बचत होते. हंगामी पिकांच्या तुलनेत बहुवार्षिक पिकासाठी खर्च कमी असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवता येतो.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर लागवड
मारवेल गवताची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी योग्य वातावरण लागवडीची पद्धत आणि सुधारित वाणांची निवड महत्वाची आहे. या गवताच्या लागवडीने शेतकऱ्यांना नियमित हिरवा चारा मिळवता येतो. तसेच त्यांचा उत्पादन खर्च कमी होतो. यामुळे मारवेल गवत शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.