भारतदेश हा उष्णकटिबंधातील देश असुन कृषि व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय आहे. अलिकडच्या काळात दुग्ध व्यवसाय पशुपालकासाठी एक वरदान ठरलेला आहे. दूध हे खर्या अर्थाने परिपूर्ण व सर्वोत्तम आहार होण्यासाठी गुणवत्तापुर्ण दूग्ध उत्पादनास काही महत्वाच्या बाबीवर लक्ष देणे गरजेचे असते. दूध हे सर्वोत्तम अन्न समजले जाते.
परंतु दूधामध्ये जिवाणूंची वाढ झपाट्याने होत असल्याने दूधाची प्रत खराब होण्याची शक्यता अधिक असते कारण दूध काढल्यानंतर ते ग्राहकापर्यन्त पोहचेपर्यंत दूधाची वेगवेगळ्या स्तरांवर हाताळणी केल्या जाते म्हणून दूग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी पुढील प्रमाणे आवश्यक बाबींचा प्राध्यान्याने विचार करणे गरजेचे आहे.
१. गोठयाची स्वच्छता :
दुध काढण्यापूर्वी गोठयातून शेण व मुत्र साफ करावे. जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगळी असावी. गोठयात सांडपाणी वाहुन जाण्याची व्यवस्था करावी. गोठयातील भिंती वर्षातुन किमान दोन वेळा चुना वापरुन रंगावून घ्याव्यात.
तसेच गोठ्यातील गव्हाणी, गटारी, भिंती व छत इत्यादींची स्वच्छता राखावी. असे केल्याने स्वच्छ दूध निर्मिती करण्यास मदत होते. सर्व सफाई आटोपल्यानंतर गोठयातील फरशी, जमीन जंतूनाशकांचा वापर करुन पाण्याच्या सहाय्याने शिंपडून साफ करावी. याकरीता फिनॉल या जंतूनाशकाचा वापर करावा.
२. निरोगी जनावर :
दूधाळ जनावर कोणत्याही रोगाला बळी पडणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असते. जर जनावर निरोगी असेल तर त्यापासुन स्वच्छ दूध निर्मीती करणे शक्य होते म्हणून दूधाळ जनावर नेहमी निरोगी असावे.
जनावरांतील विविध आजारांची लागण मनुष्याला ही होऊ शकते उदा. क्षय, रोगांचे जंतु क्षयरोग ग्रस्त जनावराच्या दूधातुन मणुष्याच्या शरीरामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याने रोगी जनावरांचे दूध सेवनाकरीता वापरु नये. तसेच अशा प्रकारचे दूध इतर (निरोगी) जनावरांच्या दूधामध्ये मिसळू नये. रोगग्रस्त जनावराची पशुवैद्यकाकडुन तपासनी करून औषधोपचार करावा.
३. कासेची स्वच्छता :
दूध काढण्यापूर्वी व दूध काढल्यानंतर सर्वप्रथम दुधाळ जनावराची कास स्वच्छ केल्याने स्तनदाह सारख्या रोगास आळा घालण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दूग्ध उत्पादन स्वच्छ व धूळ विरहीत मिळते. याकरीता दूधाळ जनावराची कास कोमट पाण्याने स्वच्छ धूवुन स्वच्छ व निर्जंतुक कापडाने स्वच्छ करावी. याकरीता वापरण्यात येणा-या पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅगनेचे दोन ते तीन खडे मिसळवावे. प्रत्येक वेळी कास पुसण्यासाठी शक्यतो स्वच्छ कापडाचा वापर करावा.
दुधाचे पाश्चरायझेशन म्हणजे नेमकं काय? आणि हि प्रक्रिया का आहे गरजेची
४. दूध काढतांना घ्यावयाची काळजी :
दूध अधिक काळ टिकून राहण्यासाठी दूधाच्या पहिल्या चार धारा वेगवेगळया भांडयात घेवून सूर्यप्रकाशामध्ये ओतून घ्याव्यात. या पहिल्या दूधामध्ये जिवाणूची संख्या अधिक असते. दूध दोहण ७ ते ८ मीनीटामध्ये पूर्ण करावे.
धार काढल्यानंतर जनावरांस कमीत कमी एक तास खाली बसू देवू नये कारण एक तासापर्यंत दूध काढल्यानंतर सडाची छीद्रे उघडी असतात. दोहण्याची क्रिया आटोपल्यावर सड डिपकप अथवा निर्जंतूक द्रावणामध्ये बूडवावे असे केल्याने स्तनदाह (काससूजी) या रोगास आळा बसण्यास मदत होते. त्याचप्रमाणे रोगी जनावरांचे दुध सर्वात शेवटी काढावे व निरोगी जनावरांच्या दूधात मीसळू नये.
५. दूधाची वाहतूक व साठवणूक :
दुधाची गुणवत्ता ही सुखद वास, चव, स्वच्छता व टिकाऊपणा या बाबीवर अवलंबुन असते, जितकी जिवाणुची संख्या कमी तितकी दुधाची प्रत उत्तम दर्जाची असते. या करीता दुधाची वाहतूक स्वच्छ भांडयामधून करावी. दूध काढल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासामध्ये दूध संकलन केंद्रावर पोहचेल याची दक्षता घ्यावी.
मोठयाप्रमाणात दूधाची वाहतूक करावयाची झाल्यास दुधाच्या भांडयाची व्यवस्थीतरीत्या मांडणी करावी व भांडयाचे झाकन व्यवस्थित लावले किंवा नाही याची काळजी घ्यावी. जेनेकरुन धुळ व कचरा दुधामध्ये शिरणार नाही. दुधाची साठवणूक करतांना नेहमी दूध ५° से. किंवा त्यापेक्षा कमी तापमानात साठवणे गरजेचे असते. यामुळे जिवाणूंची वाढ मर्यादीत राखल्या जावून दूध अधिक काळापर्यंत टिकून राहते.
अशा प्रकारे दुध उत्पादन करतांना वर नमुद केलेल्या बाबींचा दुधाळ जनावराच्या संगोपनामध्ये समावेश केल्यास दुग्ध उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल. या सर्व बाबींसोबत दुधाळ जनावरांना संतुलीत आहार देणे गरजेचे आहे. या करीता हिरवा चारा, वाळलेला चारा तसेच दुग्ध उत्पादनाच्या प्रमाणात खुराकाचे प्रमाणात व खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे. असे केल्यास दुग्ध व्यवसाय नक्कीच फायद्याचा होऊ शकेल.
डॉ. एस.एम. खुपसे
सहाय्यक प्राध्यापक, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर मो. नं. ८६०५५३३३१५
श्री. एन एम मस्के
प्राचार्य, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर