Join us

गुरांचे लसीकरण करा; लाळ खुरकत, पीपीआर प्रतिबंध करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 11:19 AM

लसमात्रा झाल्या उपलब्ध : जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

राज्यात गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांसह शेळ्या व मेंढ्यावर्गीय जनावरांना लाळ खुरकत रोगाची लागण होत आहे. यामुळे जनावरे दगावण्याची भीती असल्याने पशुपालकांत भीतीचे वातावरण आहे. या रोगावर नियंत्रणासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात लसमात्रा उपलब्ध झाल्या असून, पशुपालकांना पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क करून जनावरांना ही लस देत लाळ खुरकत व पीपीआर आजाराला प्रतिबंध करता येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण ६२ पशुवैद्यकीय संस्थांना या लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.

जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती होते कमी

पशुधनातील लाळ खुरकत हा रोग विषाणूजन्य आहे. या आजारात पशुधनास १०५ ते १०६ डिग्री या प्रमाणात ताप येतो. या आजाराने दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते, जनावरांच्या खुरामध्ये, तसेच तोंडामध्ये जखमा होतात व खाणे-पिणे बंद होऊन त्यांची  रोगप्रतिकारशक्ती कमी होते. गाभण गाय, म्हैस यांचा गर्भपात होऊ शकतो. या रोगाची लागण एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होते.

लसीकरण हाच प्रभावी उपाय

या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. शेळ्या, मेंढ्यांमधील पीपीआर हा रोगदेखील विषाणूजन्य असून, या आजारात १०५ ते १०६ डिग्री या प्रमाणात ताप येतो. नाकातून व डोळ्यातून सारखे पाणी वाहते. तोंडामध्ये जखमा होतात, श्वास घेण्यास त्रास होतो. जनावरांना हगवण लागून यामुळे मृत्यू होतो. या रोगाची लागणसुद्धा एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होते. यावरही प्रतिबंधक लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.

वाशिम जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनास या रोगाची लागण होऊ नये, याकरिता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय गोरे, जि.प.चे प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर देशमुख आणि सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अरुण यादगिरे यांनी केले आहे.

लाळ खुरकत रोगासाठी लसीकरण सुरू, कसा ओळखावा आजार?

गाय व म्हैसवर्गीय जनावरांसाठी १.८८ लाख लसी

जिल्ह्यात गाय-म्हैसवर्गीय जनावरांच्या लाळ खुरकत रोगावर प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने लसीकरण करण्यासाठी पशू संवर्धन विभागाकडून १ लक्ष ८८ हजार ६०० लसमात्रा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधआरोग्य