रविंद्र शिऊरकर
जेमतेम चारशे ते साडेचारशे लोकवस्तीचं गाव असलेल्या बायगाव (ता. वैजापूर) येथील दत्तू व नानासाहेब मुरलीधर जाधव यांनी आपल्या एकत्रित कुटुंब सदस्यांच्या मदतीने दुग्धव्यवस्थापनातून आर्थिक प्रगती साधली आहे. २०१९ मध्ये एका गाईपासून सुरु केलेला हा व्यवसाय आजपावतो १४ गाई ७ कालवडीच्या माध्यमातून ७० फूट लांब ४० फूट रुंद बंदीस्त गोठ्यात सुरु असून वर्षाकाठी या कुटुंबाचे तीन ते चार लाख रूपये उत्पन्न आहे.
या व्यवसायासाठी दत्तू आणि त्यांनी पत्नी आशाबाई, नानासाहेब यांच्या पत्नी स्वाती आणि दोघांचे चिरंजीव व कन्या यांच्या समवेत हे कुटुंब वैरण देणे, धारा काढणे, शेण उचलणे, स्वच्छता राखणे आदी कामे विभाजून करतात. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन, कुट्टी मशीन, आदींच्या वापरामुळे मजुरांची गरज पडत नसल्याचे जाधव यांनी सांगितले. सकाळी ५ पासून दूर होणारी या गोठ्याची दिनचर्या सकाळी ८ पर्यंत वैरण टाकण्यासह पूर्ण होते तर सायंकाळी ५ ते ८ पर्यंत कामे चालतात.
जाधव यांना एकूण ५ एकर शेती असून त्यात दोन एकर मोसंबी बाग आहे. तर एक एकर घरच्या शेतात नेपियरची लागवड केली असून सोबत सुका चारा म्हणून कडबा कुट्टी, गहू भुसा, तसेच खरीप आणि रब्बी हंगामातील मक्केचा मुरघास ते साठवून ठेवतात. वैरणीमध्ये दररोज गाईंना टी एम आर म्हणजे टोटल मिक्स रेशन याप्रमाणे सुका चारा नेपियर कुट्टी आणि मुरघास अशी एकत्रित चारा वैरण सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळेस दिली जाते.
रेतन निवड व कालवड संगोपन
जाधव यांच्या गोठ्यात ५ ते ६ गाई या विकत आणलेल्या आहेत तर उर्वरित सर्व गाई या गोठ्यातचं तयार झालेल्या आहेत. ए बी एस, डेनमार्क, बाएफ आदी कंपन्यांच्या दर्जेदार रेतन कांडीचा वापर होतो. डॉ भगवान कवाडे यांच्या मदतीने या गाईंची योग्य वेळेत कृत्रिम रेतन केले जाते. सध्या जाधव यांच्या गोठ्यात दोन वेळेचे मिळून ३० लिटर दुध देणाऱ्या घरच्या कालवडी आहेत.
दूध संकलन केंद्र उभारणी
नानाभाऊ जाधव यांनी या सोबतचं दोन वर्षांपासून गावात व परिसरात अमृत दूध संकलन केंद्र सुरू आहे. किरायाच्या गाडीने हे दूध पूर्वी संकलित करून शितकरण केंद्रा पर्यंत पोहचविले जायचे. मात्र दुग्ध व्यवसायातून त्यांनी गेल्या वर्षी एक पिकअप घेतले असून सध्या त्याद्वारे दररोज १६०० लिटर दुध संकलित केले जाते.
अर्थकारण
या गाईंपासून दररोज १३० लिटर दुध उत्पादित होत असून १०० ते १५० लिटर दरम्यान दुधाचे सातत्य असल्याचे जाधव यांनी सांगितले. या दुधाला ३३ ते ३४ दर मिळतो तसेच वार्षिक १५-१८ ट्रॉली शेणखत मिळते त्यापैकी १० ट्रॉली शेणखत ते विक्री करतात ज्याची साधारण ७५०० रूपये ट्रॉलीने विक्री होते. अशा प्रकारे खर्च वजा जाता साधारण ३ ते ४ लाख रुपये वार्षिक उत्पन्न जाधव यांना गोठ्यातून मिळते.
गोठा सुरु करणाऱ्या तरुणांना सल्ला
जाधव सांगतात अनेक तरुण सध्या या धंद्यात येऊ पाहत आहेत. मात्र, इथे वास्तविक जे कामे असतात त्यांना कंटाळून ते गोठा बंद करतात तसेच दूध आणि पैसा या गणितामध्ये तरुण चांगली कालवड तयार करणे, कष्टाची तयारी ठेवणे तसेच सातत्य राखणे आदी बाबतीत माघार घेतात ज्यामुळे नवीन गोठे लवकर बंद होतात.