आपल्या देशात सण आणि महोत्सव साजरे करताना आपण काहीही कमतरता ठेवत नाही. अत्यंत उत्साहाने सर्व सण साजरे करतो आनंद उपभोगतो आणि तीच आपली संस्कृती देखील आहे. दिवाळी सण हा सणांचा राजा. जर वर्षी सलग सहा दिवस साजरा होणारा हा सण यावर्षी आपण कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत संयमाने आणि काळजी घेत साजरा करणार आहोत. या मोठ्या सणाची सुरुवात आपल्याकडे गोधन पूजनेने म्हणजे 'वसुबारस' vasubaras ने सुरुवात होते. अश्विन महिन्यातील वद्य द्वादशीला गोधन पूजनेने दीपावली सुरुवात होते. घरासमोर रांगोळ्या काढून, महिला मंडळ उपवास करून सर्व मनोकामना, मुलाबाळांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून प्रत्यक्ष गाईची पूजा केली जाते. जिथे या शहरीकरणामुळे गायी उपलब्ध होत नाहीत तिथे मात्र वेगवेगळ्या माती, चांदी, याच्या प्रतिमा, गाईच्या प्रतिकृती उपलब्ध करून त्यांची पूजा केली जाते. अगदी शेवटी रांगोळी काढून देखील पूजा केली जाते. अशा या गाईची माहिती आपल्या होण्या होण्यासाठी हा लेखप्रपंच.
अनादिकालापासून गोपालन हे आपल्या देशात केले जाते. भौगोलिक परिस्थिती आणि नैसर्गिक साधनसामग्रीचा उपलब्धतेवर देशाच्या विविध भागात गोवंशाची निर्मिती होत गेली. पूर्वीच्या काळी गोधनाच्या संख्येवर कुटुंबाची श्रीमंती मोजली जात होती. गर्ग संहितेत वर्णन केल्याप्रमाणे गो संख्येवरून गोपालकांना पदव्या बहाल केल्या जात असत. पाच लाख गाई सांभाळणारा 'उपनंद' दहा लाख गाई सांभाळणारा 'वृषभानु' पन्नास लाख गाई सांभाळणारा 'वृषाभानुवर' आणि एक कोटी गाई संभाळणारा हा 'नंदराज' अशा पदव्या बहाल केल्या जात. महाभारतात पाडवांकडे प्रत्येकी आठ आठ लाख देशी गायीचे कळप होते. विशेष बाब म्हणजे नकुल आणि सहदेव हे पशुवैद्य म्हणून त्यांची देखभाल करत होते असा सगळा इतिहास आणि माहिती आपण वाचत आलो आहोत.
हळूहळू भौगोलिक सामाजिक आणि सांस्कृतिक बदल होत गेले. गाई-म्हशींचा वापर हा अनुक्रमे बैलं निर्मिती आणि दुधासाठी होऊ लागला. शेती पूर्णपणे बैलावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनाकडे म्हणावे इतके लक्ष त्या काळात दिले गेले नाही. गोवंशाची विविधता भौगोलिक, सामाजिक, आणि आर्थिक परिस्थितीशी संलग्न असल्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार हा त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे केला. आजमितीला जगात ७२५ गोवंश आहेत. आफ्रिका खंडात १२०, युरोप खंडात ३०५ आणि अमेरिका खंडात ११० गोवंश आहेत. आपल्या देशात एकूण ४८ देशी गोवंश आहेत. या गोवंशाचा विचार केला तर सर्व गोवंश हे त्या त्या भागातील हवामान, पर्यावरण, उपलब्ध वैरण त्याला अनुसरून आहेत.
गीर म्हंटल्यानंतर गुजरात, सहिवाल म्हंटल्यानंतर पंजाब राठी म्हंटल्यानंतर राजस्थान आणि खिल्लार म्हंटल्यानंतर महाराष्ट्र डोळ्यासमोर येतो. म्हणजे त्या त्या भागातील हवामान, पर्यावरण, वैरण त्याच्या प्रगतीला पूरक असल्यामुळे त्यांची वाढ त्या त्या भागात झाली आणि तेथील पशुपालकांनी त्याचा वापर केला महाराष्ट्रात देखिल खिलार, डांगी, देवणी, लालकंधारी, गवळाऊ या जाती अनुक्रमे सांगली-सोलापूर, नाशिक, लातूर, नांदेड, आणि वर्धा हे जिल्हे डोळ्यासमोर येतात त्याचे कारण असे आहे की या सर्व प्रजाती जमिनीची विविधता, पर्यावरण, जलसंधारणाच्या सोयी, सामाजिक स्थिती, पर्जन्यमान व स्थानिक गरजेतून या जाती निर्माण झाल्या, त्यामध्ये वाढ झाली आणि पशुपालकांनी त्या सांभाळल्या. या वरून आपल्या लक्षात येईल की ज्यावेळी अशा प्रजाती आपण स्थलांतरित करतो व संवर्धन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ज्या अडचणी येतात त्याचे मूळ यामध्ये दडलेले आहे.
वाढते औद्योगिकरण, वाढलेल्या लोकसंख्येमुळे तसेच शेतीसाठी वाढलेला जमिनीचा वापर, वाढलेली जंगलतोड, चराई क्षेत्र कमी झाले त्यामुळे कुरणात आणि जंगलाच्या आसपास जनावरांना चारण्याचा प्रकार बंद झाला. त्यामुळे मुळातच कमी असणारी उत्पादनक्षमता आणखी कमी झाली. दूध कमी झाले. आणि त्यामुळे देशी गोवंशाकडे दुर्लक्ष व्हायला लागले. जंगलात जनावरे चारण्यावर बंदी आली, शेतीतील यांत्रिकीकरण वाढले त्यामुळे एकूणच फक्त बैलाच्या उत्पादनासाठी असणाऱ्या देशी गाई दुर्लक्षित झाल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र एकूणच उपलब्ध गाईंची संख्या, असणारे दूध उत्पादन आणि आपली लोकसंख्या याचा ताळमेळ बसेना. या प्रचंड लोकसंख्येला कमी किमतीत पूरक असे अन्न म्हणून दूध पुरवठा करणे आवश्यक होते. त्यामुळे संकरिकरणांचा निर्णय घेण्यात आला. तो प्रचंड यशस्वी झाला आणि आपण दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचलो.
संकरिकरणांमुळे देशातील करोडो अल्प, अत्यल्प भूधारक पशुपालक हे स्वतःच्या पायावर उभे राहिले. त्यांच्या एकूणच आर्थिक परिस्थितीमध्ये अमुलाग्र बदल झाले आणि त्यांच्या जीवनात स्थिरता आली हे महत्त्वाचे परिणाम या संकरिकरणामुळे दिसले याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. भारतासारख्या खंडप्राय देशात अशा प्रकारची योजना राबवताना देशी गोवंशाकडे आणि त्याच्या दूध उत्पादनाकडे दुर्लक्ष झाले हे कबूल करावे लागेल. संकरिकरणामुळे काही देशी गोवंशाच्या शुद्धतेवर परिणाम झाला, त्याची संख्या कमी होत गेली. काही श्रीमंत पशुपालक, सेवाभावी संस्था, पांजरपोळ यांचे लक्ष देशी गाईंच्या संवर्धनाकडे वळले आहे. आजही काही प्रमाणात शेतकरी शेती कामासाठी देशी बैल वापरतो, शेणखत, गोमूत्र यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, देशी गाईची रोगप्रतिकार शक्ती, स्थानिक वातावरणाची जुळवून घेण्याची क्षमता, त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमामुळे दूध उत्पादन वाढ होण्याची शक्यता आणि पशुपालकांच्या पशुसाक्षरते मुळे सर्व पशुपालकांनी केलेले व्यवस्थापनातील बदल यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात देशी गाई सुद्धा पशुपालकांच्या दारात मोठ्या प्रमाणामध्ये दिसू लागतील.
देशी गोवंश व वाढवण्यासाठी त्यांची नेमकी संख्या, त्यांचे दूध उत्पादन, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता, त्यांच्यामध्ये होणारे रोगांचे संक्रमण, कृत्रिम रेतनातुन जन्माला येणाऱ्या वासरांची संख्या, या सर्व बाबींचा मुद्देसूद व सांख्यिकी अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व जनावरांची इनफा संगणकीय प्रणाली वर नोंदणी मोठ्या प्रमाणामध्ये होणे आवश्यक आहे. पशुपालकांनी देखील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी ज्यावेळी इनाफ प्रणालीवर नोंदणीसाठी कानात बिल्ले मारण्यासाठी येतात त्यावेळी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. गोठ्यातील सर्व जनावरांच्या सह देशी गाई-बैलांना देखील कानात बिल्ले मारून घेण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर सरासरीपेक्षा जादा दूध देणाऱ्या गायींची नोंदणी पशुसंवर्धन विभागाच्या अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमात करणे आणि त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ज्यादा दूध देणाऱ्या देशी गायीच्या पासून निर्माण झालेल्या सिद्ध वळूच्या वीर्यमात्रा पुरवणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर गावातील निकृष्ट वळूचे खच्चीकरण करणे, मोठ्या प्रमाणामध्ये हे जातीसंवर्धन संस्था स्थापन करणे राजकीय राजकारणविरहित असणे आणि त्याच्या बळकटीकरणासाठी शासनाने देखील सढळ हाताने मदत करून अनुदान देणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मग अशा जातीसंवर्धन संस्थांमार्फत देशी जनावरे पाळणाऱ्या गोपालकांना, पशुपालकांना एकत्र आणून ठोस कार्यक्रम देशी गाईंच्या बाबतीत राबवणे शक्य होणार आहे.
सगळ्यात शेवटी महत्त्वाचे म्हणजे देशी गोवंश याचा प्रचार आणि प्रसार हा योग्य दिशेने आणि शास्त्रोक्त पद्धतीने होणे आवश्यक आहे. हे करत असताना कोणत्याही परिस्थितीत संकरित जनावरांवर अन्याय होणार नाही हे सुद्धा पहाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही बाब संबंधितांनी लक्षात ठेवायला हवी. विशेषतः शास्त्रज्ञ या विषयातील तज्ञ मंडळीं, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी या बाबी लक्षात ठेवून दोन्ही संकरित आणि देशी प्रजाती या आपापल्या ठिकाणी कशा महत्त्वाच्या आहेत, त्यांचे गुणधर्म काय आहेत, पशुपालकांना त्याचा नेमका वापर कसा करून करता येऊ शकतो, त्यांच्यामध्ये असलेल्या गुण दोषावर उपाय काय आहेत याबाबत सातत्याने बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे हे मात्र निश्चित. जर संकरित विरुद्ध देशी असा संघर्ष उभा राहिला त्याची योग्य मांडणी केली नाही, वेगवेगळ्या पद्धतीने संभ्रम निर्माण केला तर त्याचे दूरगामी परिणाम आपल्या दुग्ध व्यवसायावर होतील. म्हणून भावनिक दृष्टिकोनातून न पाहता प्रत्येकाने या दोन्ही संकरित व देशी प्रजाती आर्थिक दृष्ट्या सक्षम कशा होतील सामान्य पशुपालकाला कशा परवडतील याचे उत्तर शोधणे आणि डोळसपणे या सर्व बाबी तपासून घेतल्या तर निश्चितच वसुबारस दिवशी केलेले पूजन हे सर्व पशुपालकांच्या आणि आपण सर्वांच्या जीवनात आनंद आणल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली