येथील वारणा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत दिवाळीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना फरक बिल, कामगारांना पगार व बोनस, असे तब्बल ७५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. कोरे म्हणाले, वारणा दूध संघाने दीपावलीनिमित्त दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर २ रुपये ३० पैसे इतके उच्चांकी फरक बिल देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. मंगळवारी (दि. ३१) दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर फरक बिल, दूध बिल व कामगारांचा बोनस जमा केला जाणार आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांची व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. दूध संघाशी संलग्न असणाऱ्या तात्यासाहेब कोरे दूध साखर वाहतूक संस्था, सावित्री महिला औद्योगिक संस्था, अमृत सेवक पतसंस्था व डॉ. आर. ए. पाटील पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना एकाचवेळी बोनस देण्यात येणार असल्याचे संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, मुख्य अकाउंटंट मॅनेजर सुधीर कामेरकर, अकाउंटंट ऑफिसर प्रवीण शेलार, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले आदी उपस्थित होते.
फरक बिल, बोनस देण्याची पद्धत वारणेने सुरु केली : डॉ. कोरेवारणा परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीचा बोनस, फरक बिल व उद्योग समूहातील कामगारांना बोनस म्हणून देण्याची पद्धत महाराष्ट्रात सर्वप्रथम वारणेने सुरु केली. त्यानंतरच वारणाची ही परंपरा राज्यांमध्ये रूढ झाली, असे आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले.