Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > वासरांमधील लम्पीरोगावर अशा करा उपाययोजना

वासरांमधील लम्पीरोगावर अशा करा उपाययोजना

what are measures against lumpy disease in calves | वासरांमधील लम्पीरोगावर अशा करा उपाययोजना

वासरांमधील लम्पीरोगावर अशा करा उपाययोजना

वासरांमध्ये प्रतिकारशक्ती उच्चतम राहण्यासाठी वासरांचे आहार व निवारा व्यवस्थापन, जैवसुरक्षा, जंत निर्मूलन व बाह्यपरजीवी नियंत्रण व लसीकरण मोहीम या बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून उपाययोजना अमलात आणाव्यात.

वासरांमध्ये प्रतिकारशक्ती उच्चतम राहण्यासाठी वासरांचे आहार व निवारा व्यवस्थापन, जैवसुरक्षा, जंत निर्मूलन व बाह्यपरजीवी नियंत्रण व लसीकरण मोहीम या बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून उपाययोजना अमलात आणाव्यात.

शेअर :

Join us
Join usNext

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गायींच्या वासरामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव त्यामुळे तसेच मरतुकीचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. वासरांमध्ये प्रतिकारशक्ती उच्चतम राहण्यासाठी वासरांचे आहार व निवारा व्यवस्थापन, जैवसुरक्षा, जंत निर्मूलन व बाह्यपरजीवी नियंत्रण व लसीकरण मोहीम या बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून उपाययोजना अमलात आणाव्यात.

आहार व्यवस्थापन
- नवजात वासरांमध्ये जन्मल्यानंतर २ तासांच्या आत वजनाच्या १०% प्रमाणत चीक पाजण्यात यावा जेणेकरून चीकाद्वारे नवजात वासरांना उत्तम नैसर्गीक रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल.
कोणत्याही परिस्थितीत नवजात वासरांची उपासमार होणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणपणे वजनाच्या १०% दुध वासरांना नियमित पाजण्यात यावे. आहारात प्रथिनयुक्त अशा द्विदल चाऱ्याचा समावेश करावा.
वासरांना खुराक काफ स्टार्टर रेशन वयाच्या चौथ्या आठवड्यापासून देण्यात यावे. काफ स्टार्टर रेशनमध्ये प्रोबायोटिक देण्यात यावे.
वासरांना सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये काही वेळ ठेवल्यास आवश्यक प्रमाणात 'ड' जीवनसत्व निर्मिती होईल आणि त्यातून प्रतिकारशक्ती यात मदत होईल.
वासरांना जीवनसत्व टानिक व खनिज मिश्रणे नियमितपणे द्यावीत.

निवारा व्यवस्थापन
अति थंड, अति दमट तसेच अति पाऊस इत्यादी वातावरणातील बदलांमुळे वासरांच्या शरीरावर ताण येऊन प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. म्हणून नवजात वासरांचे प्रतिकूल वातावरण नसून संरक्षण करण्यात यावे.
नवजात वासरांना स्वच्छ, कोरडा, उबदार हवेशीर निवारा उपलब्ध करून द्यावा.
पावसाळा तसेच हिवाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या वेळी नवजात वासरांना कोरड्या व उबदार ठिकाणी ठेवण्यात यावे. थंडी जास्त असल्यास वासरांच्या शरीराचा भाग उबदार कपड्याने आच्छादित करून वासरांचे थंडीपासून संरक्षण करण्यात यावे.
वासरांची बसण्याची जागा किंवा अंगावर टाकलेले कपडे कोरडे राहतील याची काळजी घेण्यात यावी.

जैवसुरक्षा
नवजात वासरांचा जन्म स्वच्छ कोरड्या व निर्जंतुक केलेल्या जागी करण्यात यावा.
नवजात वासरांची नाळ शरीरापासून दोन इंचावर २% आयोडीनमध्ये बुडवलेल्या धाग्याने बांधून त्याच्यापुढे आणखी एक इंच सोडून नवीन ब्लेडने कापून टाकावी.
नवजात वासरांना प्रौढ जनावरांपसून वेगळे ठेवण्यात यावे जेणेकरून लम्पी आजाराने होणारे संक्रमण टाळता येते.
नवजात वासरांना ओल्या जागेवर, शेण लघवी पडलेल्या जागेवर अजिबात बांधू नये जेणेकरून संसर्गाची शक्यता टाळता येईल.
- गोठ्यामध्ये पडणारी रोगी वासरांची लाळ, नाकातील स्त्राव याचे व एकंदरीत गोठ्याचे दैनदिन निर्जंतूकीकरण करण्यात यावे. या निर्जंतूकीकरणासाठी २% सोडीयम हायपोक्लोराईड द्रावण किंवा ३% फिनाईल द्रावण गोठयात फवारावे. हे द्रावण पशूंच्या शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी तसेच फवारणी नंतर अर्धा तास वासरांना गोठ्यामध्ये जाऊ देवू नये.

जंत निर्मूलन
नवजात वासरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अशी वासरे लम्पी स्कीन डीसीज सारख्या संसर्गजन्य आजारांना बळी पडतात. म्हणून नवजात वासराचे जन्मल्यानंतर सातव्या व तदनंतर २१ दिवसांनी जंतनिर्मुलन (पायपर्याझीन २०० - ३०० मि.ग्रा. प्रति किलो वजन, पायरेन्टल पामोएट २५० मि.ग्रा. प्रति किलो वजन किंवा फेनबेंड्याझोल ५ ते ७.५ मि.ग्रा. प्रति किलो वजन) करून घ्यावे.
२ ते ६ महिने वयोगटातील वासरांमध्ये कुरणातील गवत खाल्यानंतर त्यावरील खरपड्यांद्वारे पट्टकृमीची लागण होते. या कालावधीत वासरामध्ये गोल कृमींचाही प्रादुर्भाव दिसून येतो. म्हणून अशा वयोगटातील वासरांमध्ये या दोन्ही जंतांचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी उपयुक्त जंतनाशके (फेनबेंड्याझोल + प्राझीक्वांटल - १५+५ मि.ग्रा. प्रति किलो वजन) देण्यात यावीत.
३ ते ४ आठवडे या वयातील वासरांमध्ये माती चाटण्याच्या सवयीमुळे कॉक्सिडिया या आदिजीव संवर्गातील जंतूचा प्रादुर्भाव होवून रक्ती हगवण लागल्यास कॉक्सिडिया प्रतिरोधक (अँटीकॉक्सिडियल) औषधे (ॲम्प्रोलियम @ १० मि.ग्रा. प्रति किलो वजन याप्रमाणे दररोज एकवेळ पाच दिवस पाजणे किवा मोनेनसिन @ १ मि.ग्रा. प्रति किलो वजन याप्रमाणे दररोज एकवेळ तीन दिवस) देण्यात यावीत.

बाह्यपरजीवी नियंत्रण
लम्पी स्कीन डिसीज आजाराचा फैलाव हा प्रामुख्याने कीटकांद्वारे होत असतो. यात प्रामुख्याने गोचीड, पिसवा तसेच रक्त शोषण करणाऱ्या माश्या यांचा सहभाग आढळून येतो.
वासरांचा गोठा व परिसर स्वच्छ करून सर्व कचरा गोळा करून जाळून टाकावा. गोठ्याचा पृष्ठभाग फ्लेमगन ने जाळून घ्यावा जेणेकरून कीटकाची नवीन उत्पत्ती रोखता येईल.
नवजात वासरांना पिसवांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास गोठा स्वछ करून घ्यावा आणि ४% मिठाच्या द्रावणाने गोठ्याची फवारणी करावी.
रक्त शोषणाऱ्या माश्या व इतर कीटकांच्या उच्चाटनसाठी वनस्पतीजन्य कीटकनाशक द्रावणाने वासराची व गोठ्याची फवारणी करण्यात यावी. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये १० मिली निंबोळी तेल, १० मिली करंज तेल, १० मिली निलगिरी तेल व २ ग्रॅम अंगाचा साबण यांचे मिश्रण बनवून गोठ्याच्या तसेच वासरांच्या अंगावर फवारणीसाठी वापरावे.
गोठ्याच्या परिसरातील नाल्या सतत वाहणाऱ्या असाव्यात. कोणत्याही परिस्थिती पाणी साठून राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी जेणेकरून कीटकाची उत्पत्ती रोखता येईल.
जनावराच्या गोठ्यातील शेणाची नियमितपणे विल्हेवाट लावण्यात यावी.
ज्या ठिकाणी जनावराचे शेण साठवले जाते त्या जागेवर टाकलेले शेण हे पॉलिथिन शीटने आच्छादित करण्यात यावे.

प्रतिबंधात्मक लसीकरण
सद्यपरिस्थितीत लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वासरामध्ये जास्त दिसत असून तो कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरणापूर्वी एक आठवडा अगोदर जंतनिर्मूलन करून घेतल्यास लसीकरणातून निर्माण होणारी प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे तयार होते.
गाभण गायीना लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण न चुकता करावे जेणेकरून नवीन जन्मलेल्या वासराना प्रतिकारशक्ती मिळेल.
जी वासरे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण न केलेल्या गायींना किंवा लम्पी आजाराची बाधा न झालेल्या गायींना जन्माला येतील अशा वासरांना जन्मल्यानंतर लवकरात लवकर लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात यावे.
जी वासरे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण केलेल्या गायीना किंवा लम्पी आजाराची बाधा झालेल्या गायींना जन्माला येतील अशा वासराचे लसीकरण ३ महिने वय झाल्यानंतर तात्काळ करून घ्यावे.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर

Web Title: what are measures against lumpy disease in calves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.