Join us

Milk Rates Around the World : जगभरात सध्या दुधाचे दर काय आहेत? कोणत्या देशात दूध सर्वात महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:07 AM

Milk Rates Around the World : भारतात दुधाचे उत्पादन वाढल्याने गाय दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात सध्या दुधाचे दर काय आहेत? खरोखरच आपल्याकडे दूध पाण्याच्या दराने खरेदी केले जाते का?

भारतातगाय दुधाच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दूध विक्री दरात भारताचा क्रमांक ९२ वा लागतो. येथील दूध विक्री दराचा दर प्रतिलिटर सरासरी ६० रुपये असला तरी हाँगकाँग देशात तब्बल २७५ रुपये दर मिळतो.

त्यानंतर तैवान, सिंगापूर, चीन, युके, अमेरिका आदी देशांत भारतापेक्षा अधिक दर आहेत. ट्युनिशियामध्ये सर्वात स्वस्त म्हणजे ३९ रुपये लिटरने दूध मिळत असले तरी तेथील सरकार उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देत असल्याने येथील नागरिकांना स्वस्तात दूध मिळते.

दुधाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, लहान बाळापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना दूध हे आवश्यक आहे. घरात रोज लागणाऱ्या दुधाच्या दरावर मासिक ताळेबंद अवलंबून असतो. सध्या देशात गायीचे दूध मुबलक झाल्याने गाय दूध, पावडर आणि बटरच्या दरात मोठी घसरण पहावयास मिळते.

महाराष्ट्र वगळता देशात इतरत्र गायीच्या दुधाचे प्रमाण अधिक आहे. म्हैस दूध उत्पादनात महाराष्ट्र नंबर वन आहे. देश पातळीवरील दुधाचा विचार केला तर डिसेंबर २०२३ पासून गाय दूध उत्पादनात वाढ झाली आहे.

तेव्हापासून गाय दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली. सध्या महाराष्ट्रात गाय दुधाचा दर २२ ते २८ रुपये प्रतिलिटर आहे. शासनाने प्रतिलिटर पाच रुपये आणखी तीन महिने अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यानंतरचे काय, हा प्रश्न मोठा आहे.

जागतिक पातळीवरील दूध अभ्यासकांच्या मते, जगभरातील गाय दूध उत्पादन पाहता किमान सहा महिने दुधाचे दर वाढण्याची शक्यता धूसर आहे. मग, या कालावधीत शेतकऱ्यांनी करायचे काय? याबाबत राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवर विचार होण्याची गरज आहे.

एकीकडे भारतात गाय दूध अतिरिक्त झाल्याने दर कमी झाले आहेत. दुसरीकडे जगाच्या पाठीवर दुधाला मिळणारे दर पाहिले तर भारतातील शेतकऱ्यांचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.

दूध दरात भारताचा ९२ वा क्रमांक लागतो, म्हणजे ९१ देशात आपल्यापेक्षा अधिक दूध दर आहे. ट्युनिशिया देशात सर्वात स्वस्त दूध मिळते. तेथील सरकार उत्पादक कंपन्यांना अनुदान देऊन आपल्या ग्राहकांना कमी दरात दूध पुरवठा करण्याचा प्रयत्न करतात.

दूध उत्पादनात भारत नंबर वनदुधाच्या दरात भारताचा ९२ वा क्रमांक लागत असला तरी उत्पादनात प्रथम क्रमांक आहे. सध्या देशात प्रतिदिनी २३० मिलियन टन दुधाचे उत्पादन होते. म्हणजेच जगाच्या दूध उत्पादनांच्या २३ टक्के दूध एकट्या भारत देशात उत्पादित होते.

उत्पादन खर्चाचा हिशेब कधी करणार?उत्पादन खर्चाचा हिशेब न केल्यानेच शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडतो. अलीकडील काळात शेती व दूध उत्पादनात तरुण वर्ग आलेला आहे. तो थोडाफार अभ्यास करून हिशेब मांडतो, पण गाय, म्हैस खरेदीसाठी गुंतवलेली रक्कम आपली मजुरी एवढ्यावरच तो थांबला आहे. परदेशात मात्र, दुभती जनावरे खरेदी, गोठ्यासह व्यवसायाला पूरक गुंतवलेली रक्कम, या व्यवसायात राबणाऱ्या मजुरांचा पगार आदी गोष्टींचा विचार करून दुधाचा उत्पादन खर्च काढतात.

विविध देशांचे दूध उत्पादन मिलियन टनातभारत - २३०अमेरिका - १०२पाकिस्तान - ६२हॉंगकॉंग - ६०चीन - ३९ब्राझील - ३५रशिया - ३२फ्रान्स - २५टर्की - २१न्यूझीलंड - २१युके - १५

वेगवेगळ्या देशात असे आहेत दुधाचे प्रतिलिटर दर रु.हॉंगकॉंग - २७५तैवान - २४६सिंगापूर - २२५चीन - १८५युके - १५५फ्रान्स - १२०पाकिस्तान - ८९अमेरिका - ८८भारत - ६०

जीवनावश्यक वस्तूंवरील राजकारणआपल्या देशात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या की अकांडतांडव सुरू होतो. या वस्तू जो उत्पादित करतो त्याला परवडण्यापेक्षा ग्राहकांना स्वस्तात कसे मिळेल? याकडे आतापर्यंत राज्यकर्त्यांनी लक्ष न दिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर राजकारण केले जात असल्याने दूध, साखर, कांदा उत्पादकांची परवड भारतात पहावयास मिळते.

राजाराम लोंढे वरिष्ठ बातमीदार, कोल्हापूर

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायदूध पुरवठाभारतअमेरिकाब्राझीलआंतरराष्ट्रीयशेतीशेतकरीगायव्यवसायफ्रान्सपाकिस्तानसिंगापूरचीनराज्य सरकारकेंद्र सरकार