बारामती : येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषक प्रदर्शनात सोनेरी रंगाचा घोडा, दीड फूट उंचीची बन्नुर मेंढी, १,५०० किलो वजनाचा कमांडो नावाचा रेडा, ३ फुटांची पोंगनुर गाय आकर्षण ठरले.
अकरा कोटींचा सोनेरी घोडा
- हैदराबादच्या नवाब हसन बिंद्रिप यांच्या सोनेरी रंगाच्या घोड्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
- हा घोडा पाहण्यासाठी शेतकऱ्यांची आणि अश्वप्रेमींची गर्दी झाली होती.
- विशेष म्हणजे, या घोड्याची मालेगावच्या यात्रेत ११ कोटींची किंमत सांगितली होती. त्यामुळे प्रदर्शनातील हा ११ कोटी रुपये किमतीचा घोडा चर्चेत आहे.
- विशेष म्हणजे, मारवाडी पठड्याच्या हा घोडा असून, तो देशात एकमेव असल्याचा दावा नवाब यांनी केला आहे.
- हा घोडा ८ वर्षांचा आहे, तो त्यांनी पुष्करच्या यात्रेतून खरेदी केला आहे.
- त्या घोड्याचा खुराक ऋतुमानानुसार वेगवेगळा असून, त्याचे डोळे आणि शरीर यांचा रंग एकसारखा असल्याने हा घोडा अतिशय आकर्षित करत आहे.
या घोड्याबरोबर छायाचित्र काढण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचे चित्र होते.
पिंपरी सांडसचे अमित शिंदे यांचा बारामतीच्या कृषक प्रदर्शनातील तीन फुट १,५०० किलो वजनाचा १ कोटी रुपये किमतीचा कमांडो नावाचा रेडाही भाव खाऊन गेला.
या रेड्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली होती. दररोज या रेड्याला ५० किलो चारा, सरकी, खोबरे पेंड, एक किलो गावरान तूप आणि १० लीटर दुधाचा आहार आहे.
तसेच नांदेडच्या लोहा तालुक्यातील विश्वनाथ जाधव यांची १ कोटी रुपये किमतीची रामा आणि रावण नावाची लाल कंधारी जातीचे बैल शेतकऱ्यांच्या कौतुकाचा तीन फुटी पोंगनुर गाय विषय ठरली.
तसेच कर्नाटकच्या बन्नुर येथील दुर्मीळ दीड फूट उंचीची बन्नुर जातीची मेंढी प्रथमच प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाहावयास मिळाली. याबाबत लिंगा राजू यांनी या मेंढीच्या वैशिष्ठ्यांबाबत सांगितले की, ही मेंढी चेहरा वाचणारी आहे. तिला माणसांचे भाव समजतात.
त्यामुळे घरगुती पालनासह विविध कारणांसाठी शेतकरी याचे पालन करतात. ३ फुटी पोंगनुर गाय पालनाचा बारामतीत प्रयोग यशस्वी करणारे किशोर हिंगणे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, मूळ आंध्राची ही गाय आहे.
घरातही या गायीचे पालन करणे शक्य आहे. गेल्या दोन दिवसांत केवळ पुण्यातीलच नाही तर इतर जिल्ह्यातूनही शेतकऱ्यांनी कृषक प्रदर्शनाला भेट दिली आहे.
साधारणतः दीड ते दोन लीटर दूध पोंगनुर गाय प्रतिदिन देते. या दुधाची ७ एवढी सर्वाधिक फॅट आहे. या दुधाला ५०० रुपये लीटरने मागणी असल्याचा दावाही हिंगणे यांनी केला, तसेच प्रतिदिन १० ते ११ लीटर देणाऱ्या कांक्रेज ही देशी गायीने प्रदर्शनात लक्ष वेधून घेतले.
याशिवाय प्रदर्शनात ४ ते ५ फूट लांब शिंगे असणारी पंढरपुरी म्हैस, खिल्लार बैलजोडी, ब्लॅक अॅस्टोलॉर्म, वनराजा, कावेरी, कडकनाथच्या देशी कोंबड्या, बटेर लाव्ही, बोअर शेळी, नारी सुवर्णा मेंढी, मुऱ्हा म्हैस, गीर, सहिवाल, जर्शी, देवणी, खिल्लार, कपिला गायी, लाल कंदारी, वळू आदी जनावरे शेतकऱ्यांनी जवळून अनुभवली.
मुका घेणारी सोन्या मोन्या बैलजोडी भाव खाऊन गेली, तर ६०० ते ७०० रुपये लीटर दराने दूध विक्री होणारी खिलार कपिला गायीची शेतकऱ्यांनी माहिती घेतली.