Join us

काय सांगताय.. गावतलावात तरंगतंय शेतकऱ्यांचं हिरवं सोनं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 4:24 PM

राशिवडे येथील गावतलावात अॅझोला नावाचे शेवाळ नैसर्गिकरीत्या वाढू लागले आहे. हे अॅझोला शेवाळ दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं मानलं जात. याचा वापर दुभत्या जनावरांसाठी केल्यास यातून या जनावरांसाठी लागणारी सर्व पोषणमूल्य व दुधाचे उत्पादन वाढणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा साठा या तलावात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

अमर मगदूमराशिवडे : येथील गावतलावात अॅझोला नावाचे शेवाळ नैसर्गिकरीत्या वाढू लागले आहे. हे अॅझोला शेवाळ दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं मानलं जात. याचा वापर दुभत्या जनावरांसाठी केल्यास यातून या जनावरांसाठी लागणारी सर्व पोषणमूल्य व दुधाचे उत्पादन वाढणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा साठा या तलावात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

'अॅझोला' ही वनस्पती प्रकारातील जलशैवाल तरंगतेची वर्गीय वनस्पती असून, दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. याची शेती करण्याचे प्रशिक्षण पशुसंवर्धन विभागामार्फत दिले जाते. प्रथिने, जीवनसत्त्व (अ आणि ब) तसेच क्षारतत्त्वे (कॅल्शियम, स्फुरद, पलाश, लोह, तांबे व मॅग्नेशियम) मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे पशुपालनासाठी अॅझोला महत्त्वाचे पीक आहे. आपल्याकडे हिरवा चारा मुबलक असल्याने या हिरव्या सोन्याचं मोल शेतकऱ्यांना माहिती नाही.

कृषी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाकडून याचा प्रसार गरजेचे आहे. हे शेवाळ हे हिरवळीचे खत म्हणून वापर करता येतो. नत्र स्थिरीकरण गुणधर्मामुळे व नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणूनही अॅझोलाचा वापर होतो. भातशेतीमध्ये ॲझोलाचा वापर केल्यास तणांचा बंदोबस्त करता येतो.

शेतीस पूरक जोडधंदाविहीर, दलदलीचे क्षेत्र, शेततळे यावरती शेती करून बक्कळ पैसा कमावता येतो, यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत मार्गदर्शन व प्रशिक्षणही दिले जाते. दूध देणाऱ्या जनावरांना महागड्या खाद्याऐवजी अॅझोला खाऊ घातले तर दुधाची गुणवत्ता व प्रत वाढते. हे खाद्य पशुपालकास खूप स्वस्त पडते. कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, डुकरे आणि ससे यांनाही ते देता येते. अत्यंत सोपे, अल्पखर्चिक असे अॅझोलाचे उत्पादन शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते.

जनावरांसाठी बहुगुणीअॅझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण २५-३० टक्के, १०-१५ टक्के खनिजे व ७-१२ टक्के प्रमाणात अमिनो आम्ले असते. कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, जस्त, या घटकांचे प्रमाणही चांगले असल्याने गुणवत्तेमध्ये वाढ होते.

अधिक वाचा: कमी खर्चातील पशुखाद्य अझोला कसा तयार कराल?

राशिवडे गावतलावात नैसर्गिकरीत्या वाढलेले अॅझोला शेवाळ शेतकऱ्यांनी आपल्या जबाबदारीवर मोफत घेऊन जावे. राशिवडे परिसरातील शेतकऱ्यांनीही त्याचा लाभ घ्यावा, ज्यांना बियाणे म्हणून उपयोग करायचा असेल त्यांनीही मोफत घेऊन जावे. कृषी विभाग व विद्यापीठ यांच्यामार्फत त्यांना योग्य मार्गदर्शन केले जावे. - संजीवनी पाटील, सरपंच, राशिवडे

गाय व म्हैस यांना प्रतिदिन दीड ते दोन किलो, शेळी व मेंढी यांना ३०० ते ४०० ग्रॅम आणि कोंबडी २० ते ३० ग्रॅम दररोज खायला दिल्यास जनावरांना पोषक आहार मिळतो, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येते. अॅझोलामध्ये प्रथिने, अमीनो अॅसिड, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १२, बीटा कॅरोटीन) आणि खनिजे असतात, म्हणून हे जनावरांसाठी उत्कृष्ट पोषक आहार आहे. - डॉ. प्रल्हाद ढेकळे, पशुधन पर्यवेक्षक, राशिवडे

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीगायभातपाणीपीकमहाराष्ट्रसेंद्रिय खत