चिखली : चिखली गावचे पोलिस पाटील बाजीराव श्रीपती मोरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली मुन्हा जातीची सगुणा म्हैस खरेदी केली. या म्हशीने जुळ्या रेडकूंना जन्म दिला. यामध्ये एक मादी व एक नर आहे.
दरम्यान, या गोष्टीचे चिखली परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. गावचा औद्योगिक विकास झाला असला तरी चिखलीचे पोलिस पाटील मोरे यांनी शेती मातीशी नाळ जपत शेतीसोबत गायी, गुरे व दुभती जनावरे पाळण्याचा छंद जोपासला आहे.
या छंदापोटी मोरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पारनेर येथून ही म्हैस खरेदी केली. या म्हशीने एकदाच दोन रेडकूंना जन्म दिला. गाय, म्हैस या प्राण्यांमध्ये जुळे जन्माला येणे ही गोष्ट दुर्मीळ समजली जाते. याचा प्रत्यय चिखलीकरांनी पहिल्यांदाच अनुभवला आहे. जुळ्या पिल्लांना पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
गेल्या कित्येक पिढ्यांपासून आमच्या घरात जनावरांचा राबता आहे. मुळात शेतकरी असल्याने गाय, म्हैस, बैल यासारखी जनावरे आम्ही जोपासतो. परंतु एवढ्या वर्षात पहिल्यांदाच म्हशीला जुळी रेडकू झाल्याने आम्हालादेखील आश्चर्याचा धक्का बसला. या नर व मादी रेडकूला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. - बाजीराव श्रीपती मोरे, पोलिस पाटील, चिखली
गाय, म्हैस या प्राण्यांमध्ये जुळे जन्माला येणे नैसर्गिक समजले जाते. मात्र, या घटना खूप दुर्मीळ आहेत. चिखली येथील म्हशीला जुळे रेडकू झाले. म्हैस व दोन्ही रेडकूंची प्रकृती स्थिर असून, दोन्ही रेडकू सुदृढ आहेत. त्यांच्यावर योग्य प्रकारे वैद्यकीय उपचार झाले असल्याने सध्या तरी कुठलीच चिता नाही. - डॉ. रामदास मुर्हे, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक