मागील लेखात आपण असंसर्गजन्य गर्भपाताबद्दल माहिती घेतली. आज आपण संसर्गजन्य गर्भपाता बद्दल माहिती घेऊया. खरंतर गाई म्हशीतील संसर्गजन्य गर्भपात ही एक गंभीर समस्या आहे. कारण या रोगाचा प्रसार हवेतून होत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना अनेक वेळा कठीण होऊन बसते.
या रोगाचा प्रसार कशामुळे होतो?
१) या रोगाचा प्रसार गाभडलेल्या जनावरांच्या मायांगातून पडलेल्या स्त्रांवाने बाधित पाणी व वैरण यामुळे देखील या रोगाचा प्रसार होतो.
२) शेवटच्या टप्प्यात जर जनावर गाभडले आणि ते जनावर दूध देण्यास सुरुवात झाली तर अशा दुधाद्वारे देखील या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे याचा धोका खुप आहे.
३) नैसर्गिक संयोगासाठी वापरण्यात येणारा रेडा किंवा वळू देखील या रोगाचा प्रसार करतात.
४) संसर्गिक गर्भपात झालेल्या गाई म्हशी भरवण्यासाठी ज्यावेळी वळू किंवा रेडा वापरला जातो अशावेळी या रोगाचा संसर्ग त्यांना होतो. ते जेव्हा इतर चांगल्या गाई म्हशीसाठी वापरला जातो तेव्हा त्यांना या रोगाची लागण होते.
५) निरोगी जनावरात या रोगाचे जंतू प्रवेश करतात. जनावर गाभण राहिल्यानंतर या रोगाचे रोगजंतू रक्ताद्वारे गर्भाशयात पोहोचतात.
६) हळूहळू गर्भाच्या पोषणामध्ये अडथळा निर्माण करतात.
७) जारास इजा पोहचवतात व गर्भ मृत होऊन गर्भपात होतो.
या रोगामुळे पशुपालाकांचे होणारे नुकसान
१) संसर्गजन्य गर्भपात हा सूक्ष्म जीवाणूपासून होणाऱ्या ब्रुसेलोसिस, स्पायरोकिटोसिस आणि व्हिब्रिओसिस या तीन रोगात आढळतो. यामध्ये ब्रुसेलोसिस या रोगामध्ये जनावर तिसऱ्या तिमाहीत गाभडते.
२) व्हिब्रिओसिस या रोगामध्ये गर्भधारणेनंतरच्या तिसऱ्या महिन्यापर्यंत गर्भपात होत असतो.
३) संसर्गजन्य गर्भपातामुळे पशुपालकांचे खूप मोठे नुकसान होते. मिळणारे वासरू मयत होते.
४) सुरुवातीच्या गाभण काळात व शेवटच्या टप्प्यात गर्भपात होत असल्यामुळे मिळणारे वेत, वेतातील दूध उत्पादन मिळत नाही.
५) जनावर लवकर गाभण राहत नाही. भाकड काळ वाढतो. त्यामुळे पशुपालकाचा पालन पोषणाचा खर्च वाढतो.
६) ब्रुसेलोसिस हा रोग तर मोठ्या प्रमाणामध्ये मानवामध्ये संक्रमित होत असतो. अनेक वेळा दूध उकळून न पिल्यामुळे तसेच संकरीत गाई म्हशीच्या रक्ताशी, प्रजनन स्त्रांवाशी व मूत्राशी थेट संबंध आल्यावर पशुपालकांना व पशुवैद्यकांना या रोगाची लागण होऊ शकते.
७) पशुपालक, पशुवैद्यक किंवा संबंधित व्यक्तीच्या हातापायाला जखम असेल, स्वच्छता पाळली नसेल, गोठ्यामध्ये जैव सुरक्षा नसेल तर ही मंडळी बळी पडू शकतात. त्यामुळे हे रोग घातक समजले जातात.
हा रोग कसा टाळावा?
१) आपल्या राज्यात सध्या ‘राष्ट्रीय ब्रुसेलोसिस नियंत्रण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. त्यामध्ये चार महिन्यापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मादी वासरांना ब्रुसेलोसिस रोग प्रतिबंधक लस देण्यात येते. ती आयुष्यात एकदाच टोचली जाते. ती टोचून घ्यावी व आपली जनावरे कायमची या रोगापासून दूर ठेवावीत.
२) नर वासरू किंवा नऊ महिन्याच्या वरील वासरांना ही लस दिली जात नाही. प्रत्येक पशुपालकांनी नवीन जनावर खरेदी करण्यापूर्वी ‘रोझ बंगाल प्लेट टेस्ट’ (आरबीपीटी) करून घ्यावी.
३) तीन मिनिटात या रोगाचे निदान होऊन जनावर बाधित आहे किंवा नाही हे कळू शकते. त्यामुळे ही चाचणी करूनच जनावर खरेदी करावीत.
४) लसीकरण न चुकता करून घ्यावे. नैसर्गिक रेतनाचा मार्ग टाळून आपले कळप या रोगापासून दूर ठेवावेत इतकेच.
- डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: Livestock Management : गाई म्हशीतील असंसर्गजन्य गर्भपात कशामुळे होतो आणि तो कसा टाळावा? वाचा सविस्तर