Join us

गाई व म्हैशीतील लाल लघवीचा आजार कशामुळे होतो? काय कराल उपाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:32 IST

पशुधनामध्ये विशेष करून म्हशीमध्ये लाल लघवीचा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. अनेक वेळा पशुपालकाचे लक्ष नसल्यामुळे सुरुवातीला होणारी लाल लघवी लक्षात येत नाही.

पशुधनामध्ये विशेष करून म्हशीमध्ये लाल लघवीचा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. अनेक वेळा पशुपालकाचे लक्ष नसल्यामुळे सुरुवातीला होणारी लाल लघवी लक्षात येत नाही.

जनावर देखील वैरण खात असते. जसे जसे दिवस जातात तसे तसे जनावर वैरण कमी खाते. दूध उत्पादन घटते. शेण टाकताना जनावर वाकते. अशावेळी मग पशुपालकाचे लक्ष त्याच्याकडे जाते.

नेमकी लाल लघवी होत असल्याचे निदर्शनाला येते. मग उपचाराला सुरुवात होते. उशिरा उपचार सुरू झाल्यामुळे रोग आटोक्यात आणण्यासाठी खूप वेळ व पैसा खर्च होतो.

लाल लघवी कशामुळे?१) साधारणपणे हा आजार गाई म्हशीच्या गाभण काळातील शेवटच्या दोन-तीन महिन्यात किंवा व्याला नंतरच्या दोन-तीन महिन्यात आढळून येतो.२) त्याचे एकमेव कारण हे स्फुरद (फॉस्फरस) या खनिज द्रव्याच्या कमतरतेमुळे हा आजार उद्भवतो.३) गर्भाच्या वाढीसाठी व दूध उत्पादनासाठी लागणारे स्फुरद आणि आहारातून उपलब्ध होणारे स्फुरद यामध्ये असमतोल निर्माण झाला की रक्तातील लाल पेशींना आवश्यक ऊर्जा मिळत नाही.३) त्या फुटतात आणि त्यातील लाल रंगाचे हिमोग्लोबिन लघवीत उतरते. ते लघवी वाटे बाहेर पडते. त्यामुळे लघवीला लाल रंग येतो.४) मुळातच आपल्या जिल्ह्यातील जमिनीत स्फुरदचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे अशा जमिनीत घेतलेल्या चारा पिकात, वैरणीत स्फुरद कमी असते. ५) त्यामुळे असमतोल निर्माण होऊन स्फुरद ची कमतरता निर्माण होते व जनावरे लाल लघवी करतात.

आजाराची लक्षणे१) या रोगात सुरुवातीला जनावरे वैरण खात असतात. नंतर मात्र वैरण कमी खातात.२) डोळे, योनीतील त्वचा पिवळसर दिसायला लागते.३) रक्तक्षय होऊन कावीळ होते.४) डोळे खोल जातात.५) श्वास घ्यायला त्रास होतो.६) रक्तक्षय मोठ्या प्रमाणात झाल्यास इतर निरोगी जनावरांचे रक्त द्यावे लागते.७) ते वेळेत न दिले गेल्यास जनावर दगावते किंवा गाभण असल्यास गर्भपात होतो.

उपचार१) या रोगाचे तात्काळ निदान झाल्यानंतर तज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.२) नियमित सर्व जनावरांना खनिज मिश्रणे द्यावीत.३) संतुलित पशु आहार द्यावा.४) गाभण काळात देखील नियमित पशुखाद्य व खनिज मिश्रणे द्यावीत.५) चारा पिके घेताना शेतात सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरल्यास चांगले परिणाम दिसून येतात.या उपायांनी ह्या जीवघेण्या आजारापासून आपले पशुधन आपण वाचवू शकतो.

या आजारामध्ये गाई म्हशीचे तापमान हे नॉर्मल असते हे विशेष. अनेक वेळा जनावराचे तापमान वाढून जनावरे विशेषता गाई लाल लघवी करतात. अशा वेळी तो बबेसिओसिस नावाचा गोचीड ताप असू शकतो.

लहान वासरे, रेडक ज्या वेळेला ज्यादा पाणी पितात त्यावेळी देखील लहान वासरे, रेडक लाल लघवी करतात. या गोष्टी पशुपालकांनी लक्षात ठेवाव्यात.

डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: Milk Fever in Cattle : गाई-म्हशीतील दुग्धज्वर आजार कशामुळे? काय कराल उपाययोजना

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधदूध पुरवठाशेतकरीपीकगाय