अनेक वेळा आपल्या गोठ्यातील गाई म्हशी व्यायला झाल्यानंतर शेवटच्या दिवसात जसा जसा कासेला रक्तपुरवठा वाढत जातो तसा कासेला मोठ्या प्रमाणात सूज आलेली आढळते. त्याला हल्पा असेही म्हणतात.
खरंतर कासेच्या पेशी मधील जागेत मोठ्या प्रमाणामध्ये द्रव साठून ही सूज येते. व्यायला झालेल्या जनावरात सौम्य सूज येणे हे सामान्य आहे. पण ही सूज मोठ्या प्रमाणात आली तर मात्र योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
कास सुजल्यामुळे येणाऱ्या अडचणी
◼️ मोठ्या प्रमाणात आलेल्या सुजेमुळे जनावर व्याल्यानंतर धारा काढणे, कासेला सडाला जखमा होणे, स्तनदाह होणे, दूध उत्पादन घटने अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात.
◼️ विशेष करून पहिलारू कालवडी व रेड्या यांच्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते.
◼️ अनेक वेळा अशा प्रकारच्या सुजेमुळे नवजात वासराला चीक पिण्यासाठी अडचणी निर्माण होतात.
◼️ पान्हा घालण्यासाठी देखील अडचण येते.
◼️ अशा अमर्यादित सुजेमुळे कास पकडून ठेवणाऱ्या स्नायूंना देखील इजा पोचू शकते.
◼️ जर पशुपालक दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर करत असतील तर सर्व सड अखूड व वेगवेगळ्या दिशेने वळलेली असल्याने मशीन वापरताना देखील अडचणी निर्माण होतात.
कासेवर सुज कशामुळे येते?
◼️ अनेक वेळा ही सूज त्वचेखाली कासेच्या पुढे सरकलेली आढळून येते. विशेष करून पहिल्यांदा विणाऱ्या कालवडी व रेडी यांच्यामध्ये रक्तातील प्रथिनांमध्ये वेगाने घट होते.
◼️ शरीरातील ॲटींबाॅडीज (प्रतिपिंडे) ही चिकामध्ये हस्तांतरित होतात. त्यामुळे देखील ही सूज आढळते.
◼️ गाभण काळात मोठ्या प्रमाणात सोडियम, पोटॅशियम घटकानी युक्त असा आहार दिला किंवा कडधान्याचा चारा जादा प्रमाणात खाऊ घातल्यास, प्रथिनांसह कॅल्शियम व पोटॅशियमयुक्त आहार दिल्याने देखील कासेवर सूज येते.
◼️ अनेक वेळा सोयाबीन पेंडीचा अतिरिक्त वापर केला तरी देखील सूज येते. ही बाब अनुवंशिक देखील असू शकते.
◼️ ज्यादा पोसलेले मोठे वासरू, ज्यादा अपूर्ण वाढ झालेल्या रक्तवाहिन्यांचे कासेवरील जाळे, जादाचा दिलेला खुराक अशा एकत्रित अनेक कारणामुळे कासेवर सूज येत असते.
काय कराल उपाय?
◼️ व्याल्यानंतर एक-दोन आठवड्यात ही सूज हळूहळू कमी होत जाते. पण त्याला वेळ लागत असेल आणि जनावराला त्रास होत असेल तर मात्र नजीकच्या तज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.
◼️ वेदनाशामक व लघवीचे प्रमाण वाढवणारी इंजेक्शन देऊन कासेची सूज व वेदना कमी करण्याचा प्रयत्न करावा.
◼️ सोबत हलक्या हाताने वरच्या बाजूला दररोज धार काढण्यापूर्वी दहा ते वीस मिनिटे मालिश करावे. त्यामुळे उष्णता निर्माण होऊन रक्तप्रवाह वाढतो व साठलेला अतिरिक्त द्रव पदार्थ निघून जाण्यासाठी मदत होते.
◼️ अनेक वेळा परिस्थिती पाहून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने विण्यापूर्वी देखील धार काढून कास मोकळी करायची वेळ येते.
अशा पद्धतीने कासेवरील सूज नियंत्रणात आणून उत्पादन घट आपल्याला टाळता येऊ शकते.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? जाणून घ्या सविस्तर