अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. येत्या गुरुवारी जेजुरीत पौष पौर्णिमा यात्रा भरणार आहे. बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी-विक्री होत आहे. बाजारात ८०० गावठी व सौराष्ट्रातून काठेवाडी जातीच्या ३०० गाढवांची खरेदी-विक्री आली आहेत.
जेजुरीत भरणारी पौष पौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी-विक्री) पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगाली पटांगणात शेकडो वर्षांपासून येथे राज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बाराबलुतेदार परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी-विक्री करतात.
या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये प्रामुख्याने राजस्थान, गुजरात कर्नाटक, आंध्र या राज्यासह महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कराड, बार्शी, नगर, बारामती, पुणे, फलटण, जामखेड आदी ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार (पाथरवट) आदी समाजबांधव येथे विविध जातींच्या गाढवांसह दाखल होतात. गाढवांच्या खरेदी-विक्रीबरोबरच दर्शन-कुलधर्म-कुलाचार धार्मिक आदी कार्यक्रम येथे होतात.
अधिक वाचा: चार वर्षांनंतर पुसेगावात भरला खिल्लार जनावरांचा बाजार
पूर्वीच्या काळी गाढवांचा वापर जड मालाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असे. आजच्या यांत्रिक युगामध्ये ओझे वाहण्यासाठी गाढवांचा वापर कमी झाला असल्याने गाढवांची संख्या कमी कमी होऊ लागली आहे. या गाढवाला सर्वांत जास्त २५ ते ६० हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळत आहे. तर गावरान गावठी गाढवाला १० ते २५ हजार रुपये भावाची बोली लागत होती. राजस्थानी-काठेवाडी गाढव पांढरेशुभ्र असेल तर कर्नाटक-आंध्र येथून आलेले व्यापारी भावांमध्ये घासाघीस करताना दिसून येत होते.
रंगाच्या प्रतवारीनुसार आकारले जातात दर
- दोन दातांचे दुवान हे गाढव तरुण मानले जाते. चार दातांचे चौवान हे मध्यमवयीन, तर कोरा म्हणजे नुकतेच वयात येणारे असे अनुमान काढत त्यांचे दर ठरवले जातात.
- रंगावरुनही किमत करण्यात येते. पांढऱ्याशुभ्र जनावराला चांगला दर मिळतो. त्यानंतर गडद जांभळा, तपकिरी लालसर, करडा अशा रंगाच्या प्रतवारीनुसार दर आकारले जातात.
पूर्वीच्या काळी येथील बाजारात व तीन ते चार दिवस चालणाऱ्या यात्रेत गाढवांच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असे. परंतु, सध्या परिस्थिती तशी राहिली नाही. केवळ वाडवडिलांनी घालून दिलेली येथील परंपरा जोपासण्यासाठी ही यात्रा करावयाची असे काही समाजबांधवांनी सांगितले. मात्र, औद्योगिकीकरणामुळे गाढवांचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांची संख्या ही कमी होत आहे.