पशुपालकांना पशुधनाचे खच्चीकरण करून घेणे ही नित्याची बाब आहे. त्या मागचे शास्त्रीय कारण व दूरगामी फायदे सर्वांना माहीत असतीलच असे नाही.
खच्चीकरण का केले जाते?
१) साधारण हिवाळ्यात व हिवाळा संपत आल्यानंतर अनेक पशुपालक नवीन खोंडे शेतीच्या कामासाठी खरेदी करत असतात. ती खोंड पावसाळ्यात शेती कामासाठी वापरताना आक्रमक होऊ नयेत, योग्य पद्धतीने हाताळता यावीत म्हणून त्याचे खच्चीकरण करतात.
२) खोंड, रेडे, बोकड हे खच्चीकरणानंतर शांत होतात. आक्रमकता कमी होते. त्यामुळे होणारे हल्ले, अपघात टाळता येतात.
३) कळपात राहणाऱ्या पशुधनातील नर खच्ची केल्यास प्रजनन व्यवस्थापन करता येते.
४) नात्यातील नर मादी मध्ये संकर होत नाही. नर वासरांची वेगाने वाढ होते.
५) बोकडाच्या बाबतीत मांसाला येणारा उग्र वास नाहीसा होऊन मांसाची मागणी वाढते.
६) पूर्वी गावात सोडलेले वळू असत. त्यांच्यामुळे कृत्रिम वेतन केलेल्या गाई म्हशींना त्रास होत असे. तो देखील खच्चीकरण केल्याने कमी करता येतो.
खच्चीकरण कधी करावे?
१) खच्चीकरण हे नेहमी लहान वयातच करावे.
२) बोकडाच्या बाबतीत तीन ते चार आठवड्यातच खच्चीकरण करून घ्यावे.
३) खोंडाच्या बाबतीत मात्र तो दातात जुळण्यापूर्वीच करून घेणे उत्तम.
४) साधारण वयाच्या एक ते दोन वर्षात केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.
५) अनेक पशुपालक खोंडाचे लहान वयात खच्चीकरण केल्यामुळे त्यांची वाढ खुंटते व त्याचा आकार देखील बदलतो अशा गैरसमजुतीने लहान वयात खच्चीकरण करणे टाळतात.
६) जास्त वय झाल्यानंतर खच्चीकरण करताना काही अडचणी येऊ शकतात. संबंधित कॉर्ड जी चिमटण्यात येते ती कठीण व जाड होते. त्यामुळे खच्चीकरण करताना हातातून निसटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
७) अनेक वेळा पशुपालक पावसाळ्यात खायला हिरवा चारा भरपूर असताना खोंड, रेडा आक्रमक होऊ लागला की खच्चीकरण करण्याचा आग्रह धरतात. अशावेळी जो जर योग्य काळजी घेतली नाही तर मात्र खच्चीकरण केलेल्या जागी जखमा होऊ शकतात.
खच्चीकरण कसे केले जाते? खच्चीकरण केल्यानंतर घ्यावायची काळजी
१) खच्चीकरण हे जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात केले जाते.
२) त्यासाठी बर्डीझो पद्धत वापरून त्याच नावाचे उपकरण वापरून खच्चीकरण करतात.
३) हे खच्चीकरण कमीत कमी त्रासदायक होण्यासाठी स्थानिक भाग इंजेक्शन देऊन बधिर केला जातो.
४) वेदनाशामक इंजेक्शनने देऊन वेदना कमीत कमी कशा होतील याकडे लक्ष दिले जाते.
५) खच्चीकरण करून घेण्यासाठी दवाखान्यात खोंड घेऊन जात असताना शक्यतो सोबत चार दोन मित्र असावेत. जेणेकरून जनावर पाडण्यासाठी मदत होऊ शकेल.
६) खच्चीकरण केल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन दिवस विश्रांती द्यावी.
७) गोठा स्वच्छ ठेवावा. कुठेही चिमटवलेला भाग चिखल, पाणी, शेण याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी.
८) त्याचबरोबर नियमित लक्ष ठेवावे. जर वृषण सुजले किंवा त्या ठिकाणी सूज आली तर तात्काळ पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.
९) नर घोडे, श्वान यांच्यामध्ये शस्त्रक्रिया करून पूर्ण वृषण हे काढून टाकले जातात.
अशा पद्धतीने आपण जर खच्चीकरण करून घेतले तर ज्या कारणासाठी आपण खच्चीकरण करून घेतले आहे तो हेतू साध्य होईल.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: गाई-म्हशी खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स; वाचा सविस्तर