Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > जनावरांना पिण्यासाठी कोणते पाणी आवडते?

जनावरांना पिण्यासाठी कोणते पाणी आवडते?

What type water do animals like to drink? | जनावरांना पिण्यासाठी कोणते पाणी आवडते?

जनावरांना पिण्यासाठी कोणते पाणी आवडते?

जनावरांना नेहमी पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक असावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही पाण्याचा रंग, वास, चव, तापमान, पाण्यातील गढूळपणा, पाण्याचा पी.एच. व त्यात मिसळलेले क्षार, जैविक तत्त्वे, जिवाणू इत्यादींवर अवलंबून असते.

जनावरांना नेहमी पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक असावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही पाण्याचा रंग, वास, चव, तापमान, पाण्यातील गढूळपणा, पाण्याचा पी.एच. व त्यात मिसळलेले क्षार, जैविक तत्त्वे, जिवाणू इत्यादींवर अवलंबून असते.

शेअर :

Join us
Join usNext

दुधाळ जनावरांच्या आहारात पाणी फार महत्त्वाचे आहे. पचनक्रियेत अन्नघटक पाण्यात विरघळून त्यांचे संपूर्ण शरीरात विलयन होते व शरीरातील सर्व पेशींना पोषणद्रव्ये पुरवली जातात. शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

जनावरांना नेहमी पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक असावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही पाण्याचा रंग, वास, चव, तापमान, पाण्यातील गढूळपणा, पाण्याचा पी.एच. व त्यात मिसळलेले क्षार, जैविक तत्त्वे, जिवाणू इत्यादींवर अवलंबून असते. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला कुठलाही वास नसावा. पाण्याला वास त्यात मिसळलेल्या जैविक तत्त्वे, धातू, मातीचे कण इत्यादींमुळे येतो. नदीच्या, तळ्याच्या पाण्यात कुजलेली गवते, झाडे किंवा मेलेली जनावरे इत्यादींमुळे वास येतो. कुठल्याही प्रकारचा वास येणारे पाणी जनावरांना पाजू नये, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला उग्र चव नसावी. कीटकनाशके, कारखान्यांतील विषारी पदार्थ, गवत कुजून नदीतील पाण्याची चव बदलू शकते, असे पाणी जनावरांना पाजू नये. पाण्याचा रंग किंवा गढूळतेनुसार पाण्यात दूषितपणा ओळखण्यास मदत होते. गढूळ पाणी जनावरांना देण्यास योग्य नसते. पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची जैविक तत्त्वे, क्षार, धातूचे कण प्रमाणापेक्षा जास्त असू नयेत. पाण्यामध्ये जिवाणू, पोटातील कृमी, अळ्या नसाव्यात, ज्यामुळे जनावरांना आजार होण्याची शक्यता असते.

जनावरांना पाण्याच्या प्रमाणाची आवश्यकता त्यांचा आहार, जनावरांची जात, गर्भावस्था, वातावरणातील तापमान व दूध उत्पादनावर अवलंबून असते. जनावरांना दिवसातून दोनदा देण्यापेक्षा चार वेळा पाणी दिल्यास जनावरे १५ ते २० टक्के जास्त दूध देतात. जनावरांनी जर हिरवा चारा (६५ ते ८५ टक्के पाण्याचा अंश) खाल्ला, तर ते पाणी कमी प्रमाणात पितात; मात्र उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची मात्रा कमी असते, त्यामुळे ते सुका / वाळलेला चारा (दहा टक्के पाण्याचा अंश) जास्त खातात. त्यामुळे त्यांना उन्हाळ्यात जास्त पाणी पाजावे. नवीन आणलेली जनावरे शक्यतो पाण्यातील बदलामुळे पाणी कमी पितात. अशा वेळी पाण्यात थोडा गूळ टाकून पाणी पाजावे. म्हशीची त्वचा काळसर व जाड असते. कातडीमध्ये घामाच्या ग्रंथींचे प्रमाण थोडे जास्त असते. म्हणून घामाचे उत्सर्जन होत नाही, त्यामुळे शरीराचे तापमान उन्हाळ्यात कमी करणे कठीण जाते, त्यामुळे म्हशींना तळ्यात किंवा नदीत डुंबण्यास सोडावे किंवा अंगावर पाणी मारावे. जनावरांमध्ये पाणी कमी पडले तर बरेचसे आजार होऊ शकतात. डोळे कोरडे होतात, कातडी अंगाला चिकटते, जनावरांच्या वजनात घट होते. पचनावर, मूत्राद्वारे व घामाद्वारे विषारी पदार्थ बाहेर पडण्यास परिणाम होतो. शरीराचे तापमान वाढते, मूत्रपिंड व मूत्राशयावर परिणाम होतो.

जनावरांचे पिण्याचे पाणी शुद्ध असेल, तर जनावरे जास्त पाणी पितात. पाणी शुद्ध करण्याच्या उपाययोजना करून जर पाणी जनावरांना पिण्यास दिले, तर दूध उत्पादन वाढू शकते. पाण्याची साठवण म्हणजे तळे, हौद किंवा पिंप यांत बराच वेळ पाणी साठवल्याने किंवा हौद, पिंप वेळोवेळी स्वच्छ न केल्याने पाणी खराब होते. पाण्यात खडे, मातीचे कण, किडे, अळ्या किंवा
रोगजंतूंची वाढ होऊन पाणी दूषित होते. यामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. पिण्याचे पाणी पिंपात किंवा बादलीत साठवून जनावरांना पाजत असाल, तर तुरटीचा एक तुकडा घेऊन तो पिंपात किंवा बादलीच्या पाण्यात गोल-गोल फिरवावा. तुरटीमुळे पाण्याला आलेला वेगळा रंग, जिवाणू नष्ट होतात व मातीचे कण तळाशी जातात. त्यानंतर वरचे नितळ पाणी दुसऱ्या बादलीत किंवा पिंपात ओतावे व नंतर जनावरांना पाजावे. पाण्यात जर जंतू असतील, तर एक चमचाभर हळद टाकावी व मगच लहान वासरांना, जनांवरांना पाजावे. लहान वासरू आजारी असल्यास उकळून गार केलेले पाणी नियमित पाजावे. पाणी १५ ते २० मिनिटे चांगले उकळून थंड करून वासरास पाजावे.

ग्रामीण भागात जनावरे सहसा तळ्यावर, नदीवर, हौदावर पाणी पितात. बऱ्याच वेळा जनावरे तळ्यातील, नदीतील पाण्यात आत जाऊन पाणी पितात. त्या वेळी त्यांचे मल-मूत्र पाण्यात मिसळते. गावातील सांडपाणी, गोठ्यातील मल-मूत्र, जवळच्या कारखान्यांतील पाणी, शेतात वापरलेली कीटकनाशके इत्यादी पाण्यात मिसळल्याने, आजारी जनावरांनी पाणवठ्यावर पाणी पिणे इत्यादी कारणांनी पिण्याचे पाणी दूषित होते व रोगजंतूंची वाढ होते. असे पाणी जनावरांनी पिल्यास जनावरांना बरेचसे संसर्गजन्य आजार होतात. जनावरांना दूषित पाण्यापासून ॲन्थँक्स (फाशी), ब्रुसेलोसिस (संसर्गजन्य गर्भपात), ब्लॅक क्वार्टर (एकटांग्या), क्षय रोग, लेप्टोस्पायरोसिस, जोन्स रोग, लाकडी जिव्हा, सालमोनेलोसिस, हगवण इत्यादी प्रकारचे आजार होतात. या आजारांमुळे जनावरांची शारीरिक वाढ कमी होऊन जनावरे कमजोर होतात. दूध उत्पादनात घट होते. जनावरांवर ताण पडतो.

प्रतिबंधात्मक उपाय
- गावातील तळे, हौद, टाक्यांतील पाणी दूषित होण्याची कारणे शोधावीत. पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पाठवून त्यातील रोगजंतूंचे परीक्षण करून त्यानुसार पाणी शुद्धीकरणाचे उपाय योजावेत.
- पाण्यापासून जनावरांना आजार हे घरगुती सांडपाणी, गोठ्यातील मल-मूत्र, मेलेले जनावर पाण्यात सडणे इत्यादी प्रकारांमुळे होतात, त्यामुळे या सर्व बाबी पाण्यात मिसळणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी.
- गावातील तळ्यात किंवा नदीतील पाण्यात जवळील कारखान्यातील टाकाऊ पदार्थ किंवा शेतातील कीटकनाशके मिसळण्याची शक्यता असते, त्यामुळे हे घटक पाण्यात मिसळणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी.
- गावात ग्रामसभा घेऊन लोकांना पाण्यापासून जनावरांना होणारे आजार व त्याबद्दलची उपाययोजना यांची माहिती द्यावी. गावातील लोकांनी एकत्र येऊन गावातील पाणवठे दूषित होणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी.
- पाण्याची साठवण हौदात, पिंपात करत असल्यास हौद, पिंप वेळोवेळी स्वच्छ धुवावे, सूर्यप्रकाशात कोरडे करूनच पाण्याची साठवण करावी.
उन्हाळ्यात हौदात किंवा मोठ्या पाण्याच्या टाकीत पाणी जास्त वेळ साठवल्याने शेवाळाचा थर तयार होतो, तो काढून हौद वेळोवेळी स्वच्छ धुवावा.
पाण्यापासून आजार झाल्यास जनावरांचे पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

संकलन
डॉ. स्मिता आर. कोल्हे

संशोधन प्रकल्प प्रमुख, पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा

Web Title: What type water do animals like to drink?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.