Join us

Animal Care Tips : पावसाळ्यात जनावरे का लंगडतात? कशी घ्याल खुरांची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 11:00 AM

Monsoon Animal Care Tips : पावसाळ्यात सर्वत्र चिखल झालेला असतो. गोठ्यात ओलसरपणा वाढलेला असतो. अनेक वेळा गोठ्यातील खड्यांमध्ये पाणी साठलेले असते. हा ओलावा जनावरांच्या खुरांना खूप त्रासदायक ठरतो.

पावसाळ्यातील एकूण वातावरण व दलदलीचा विचार केला तर पशुधनाच्या खुरांची काळजी घेणे फार महत्त्वाचे ठरते. त्याकडे दुर्लक्ष झाले तर मात्र दूध उत्पादन घटण्यापासून बैलांची काम करण्याची शक्ती कमी होते. शेतीची कामे वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानदेखील होऊ शकते.

पावसाळ्यात सर्वत्र चिखल झालेला असतो. गोठ्यात ओलसरपणा वाढलेला असतो. अनेक वेळा गोठ्यातील खड्यांमध्ये पाणी साठलेले असते. हा ओलावा जनावरांच्या खुरांना खूप त्रासदायक ठरतो. अशा वातावरणामुळे रोगजंतूची संख्या वाढते. त्यामुळे सतत अशा वातावरणात राहिल्याने जनावरांचे खूर नरम पडतात.

पावसाळ्यात पुरेसा आहार मिळू शकत नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती क्षीण होते. प्रथिनयुक्त पशुखाद्याचा वापर ज्यादा केल्याने इतर जीवनसत्त्वे व खनिजाची कमतरता निर्माण होते. विशेष करून कॅल्शियम फॉस्फरससह झिंक सेलेनियम या सक्ष्म खनिजाच्या कमतरतेमुळे खूर आणखीन नरम होतात.

खूर तडकणे, तळवे झिजणे, खुरातून जखमा होऊन पू वाहने, खुरांच्या वरच्या भागात सूज येणे, खूर सडणे यासारखे आजार व व्याधी उत्पन्न होतात. त्यासाठी पशुपालकांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मुक्त संचार गोठ्यात पशुधन सांभाळण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा ठिकाणी जनावरे जास्त वेळ चिखलात, शेण मूत्रात उभी राहिल्यामुळे खूर नरम पडून जर एखादा खडा केव्हा कठीण वस्तू पायात अडकून राहिली तर त्या ठिकाणी जखम, व्रण तयार होऊन जनावर लंगडायला सुरुवात होते.

अनेक जनावरांना बसायला उठायला त्रास होतो. अनेक वेळा खुरांना भेगा पडतात. खर सडतात त्या ठिकाणी फ्यूजीफॉर्मस मायक्रोफोरस नावाच्या रोगजंतूमुळे खुरांना घाण वास येतो. खूप एकमेकांपासून दूर जातात. याकडे दुर्लक्ष झाले तर जखम खोलवर जाऊन कायमचे लंगडेपण येते.

अनेक वेळा शेळ्यांमध्ये हा प्रकार खूप वेळा दिसून येतो. मान्सूनपूर्व लाळ खुरकत रोगाची बाधा झाली असेल आणि योग्य काळजी व औषधोपचार केले नसतील. तर खुरांना पडलेल्या भेगात माती, चिखल जाऊन जखमा होतात.

अनेक वेळा खूर देखील निखळतात. त्यामुळे बैलांची कार्यक्षमता व दूध देणाऱ्या जनावरांची उत्पादन क्षमता कायमची कमी होते.

अशा करा उपाययोजना- हे सर्व टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी व दीपावलीदरम्यान एकदा पशुवैद्यकांकडून खुरांची तपासणी करून घ्यावी. योग्य अनुभवी व्यक्तीकडून खूर तासून घ्यावेत.गोठा नेहमी कोरडा व स्वच्छ असावा.नियमित जनावरांचे खूर हे ३ ते ५ ग्रॅम मोरचूद १०० मिली पाण्यात टाकून किंवा १ ग्रॅम पोटॅशियम परमॅग्नेट १०० मिली पाण्यात टाकून त्यांनी खूर धुवावेत.नियमित खनिजे मिश्रणे द्यावीत.'ड' जीवनसत्त्वासाठी गोठ्याची बांधणी करताना सकाळचे कोवळे ऊन अंगावर पडू शकेल, अशाप्रकारे असावी.गोठ्यात वापरण्यासाठी रबरी मॅटदेखील उपलब्ध आहेत. त्याचा वापर केल्यास जनावरांच्या खुरांची हानी कमी होऊ शकते.फक्त नियमितपणे त्याची स्वच्छता राखणे व मॅट खालची जागादेखील स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक असते.पावसाळ्यातदेखील सकस आहार नियमित द्यावा.

या सर्व बाबींची काळजी घेतली तर पावसाळ्यात खुरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

डॉ. व्यंकटराव घोरपडे सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

अधिक वाचा: मस्टायटिस होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला हव्यात वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायगायपाऊसदूध