प्रत्येक पशुपालकांना आपल्या गाई म्हशी योग्य वेळी आटवल्यास येणाऱ्या वेतात ज्यादा दूध देतात हे माहिती आहे. अनेक पशुपालकांना त्यांच्या गाई म्हशी आटवायला लागतच नाहीत अशी देखील परिस्थिती आहे.
गाय-म्हैस का आटवतात?१) दूध देणाऱ्या गाई म्हशींच्या गाभण काळात शेवटचे ७०-७५ दिवस कासेला विश्रांती मिळण्यासाठी योग्य पद्धतीची काळजी घेऊन आटवणे आवश्यक आहे.२) शेवटच्या तीन महिन्यात गर्भाची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते.३) सोबत दूध तयार होणाऱ्या पेशींचे पुनरुत्पादन होण्यासाठी व कास आरोग्यदायी स्थितीत राहण्यासाठी आटवने फार महत्त्वाचे आहे.४) गाभण काळात एक प्रकारचा शरीरावर ताण आलेला असतो.५) दूध उत्पादन घेणे बंद करून दूध उत्पादनासाठी खर्च पडणारी ऊर्जा व पोषक तत्वे ही गर्भातील वासराच्या योग्य वाढीसाठी वापरली जातात. त्यासाठी गाय म्हैस आटवने फार महत्त्वाचे आहे.
गाय-म्हैस कशी आटवावी?१) गाय म्हैस आटवण्याची सुरुवात करताना त्यांचे ऊर्जा युक्त खाद्य व वैरण कमी करावी. ओली वैरण कमी करून वाळलेली वैरण द्यावी.२) दूध काढण्याच्या वेळेत बदल करावा.३) सोबत कोणत्याही परिस्थितीत स्तनदाह होणार नाही यासाठी दक्ष राहून बारीक निरीक्षण करावे. तसे काही आढळल्यास तात्काळ उपचार करावेत. गाई म्हशी या सवयीच्या गुलाम असतात. त्यामुळे आटवताना वेळा बदलून धारा काढाव्यात.४) धारा काढताना पाण्याचा वापर न करता त्या न पान्हवता कासेत, सडात असेल तितके दूध काढून घ्यावे.५) इतर जनावरांच्या धारा काढताना अशा गाभण गाई म्हशी ज्या आपण आटवत आहोत त्या दूर बांधाव्यात. अन्यथा धारा काढताना होणारा भांड्यांच्या आवाजा मुळे देखील अशी जनावरे पान्हा घालतात. पुन्हा स्तनदाह होण्याची शक्यता वाढते.६) एकदा का जनावर आटले की शेवटी पूर्णपणे कास पिळून घ्यावी व त्यामध्ये प्रतिजैवक औषधे सोडून घ्यावीत किंवा उपलब्ध प्रतिजैवेक ट्यूब सोडावे.७) सदर गाई म्हशींवर दररोज लक्ष ठेवावे. कासेवर पूर्णपणे घड्या पडल्या व त्याचा आकार हळूहळू कमी होत गेला की आपली गाय म्हैस आटली असे समजायला हरकत नाही.
गाय-म्हैस आटवण्याच्या काळात कशी काळजी घ्यावी?१) दरम्यानच्या काळात जर का कासेला सूज आली, सड सुजले तर मात्र तात्काळ पुन्हा कास मोकळी करून प्रतिजैवकांचे ट्यूब कासेमध्ये भरावी व पुन्हा लक्ष ठेवावे. यामुळे कासेत असणारे सर्व रोगजंतू मारले जातात व कासेतील वातावरण निरोगी ठेवले जाते.२) आतील पेशींची वाढ व्यवस्थित होऊन व्याल्यानंतर ज्यादा दूध उत्पादन मिळण्यासाठी मदत होते.३) आटलेल्या गाई म्हशी गोठ्यातच बाजूला बांधून गोठा कोरडा व स्वच्छ राहील याकडे लक्ष द्यावे.शेजारी कोणतेही वासरू किंवा रेडकू बांधू नये.४) चुकून ते जर दूध प्याले तर पुन्हा ती गाय किंवा म्हैस पान्हवली जाऊन स्तनदाह होऊ शकतो. तो व्याल्यानंतरच लक्षात येतो. मात्र त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. अशा पद्धतीने आपण जर योग्य काळजी घेऊन गाय म्हैस आटवली तर निश्चितपणे व्याल्यानंतर पूर्वीच्या वेतापेक्षा दूध उत्पादन वाढलेले आढळून येईल.५) विशेष करून जादा दूध उत्पादन देणाऱ्या गाई म्हशींना प्रयत्नपूर्वक आटवावे लागते. पण कमी दूध देणाऱ्या गाई म्हशी साधारण सातव्या महिन्यातच आपोआप आटतात. अशावेळी फक्त प्रतिजैवकेची ट्यूब पशुवैद्यकांच्या सल्ल्याने सडात सोडल्यास आपले जनावर पुढील वेतात ज्यादा दूध देण्यासाठी तयार होते.
डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: गाई व म्हशी विताना येणाऱ्या अडचणी पशुपालकांनो कशी घ्याल काळजी