अनेक वेळा जनावर गाभण असताना योनीमुखाचा काही भाग काही वेळा गर्भाशया मुखाचा काही भाग किंवा संपूर्ण गर्भाशय निरणाबाहेर पडते त्याला मायांग बाहेर पडणे किंवा भांडे बाहेर पडणे असे म्हणतात.
साधारणपणे हे योनीमुख, गर्भाशयमुख किंवा गर्भाशय आपली मूळ जागा तात्पुरती सोडून बाहेर पडत असते. हे गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात जादा करून पाहायला मिळते. अनेक वेळा आपल्या भागात गर्भाशय बाहेर पडल्याच्या घटना दिसून येतात.
अशावेळी आपल्याला तात्काळ उपाययोजना व उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. साधारण व्याल्यानंतर संपूर्ण गर्भाशय बाहेर पडण्याचे प्रकार दिसून येतात. त्यामुळे वेळीच योग्य उपचार नाही मिळाले तर दूध उत्पादनासह त्याच्या वंध्यत्वावर परिणाम होऊ शकतो.
गाई म्हशीचे मायांग बाहेर पडण्याची कारणे१) अनेक वेळा गाभण काळात शेवटच्या टप्प्यात जादा प्रमाणात इस्ट्रोजन हे हार्मोन स्त्रवले जाते. त्यामुळे गर्भाशयाचे स्नायू शिथिल होऊन मांयांग बाहेर पडू शकते.२) वासरू किंवा रेडकू वजनाने मोठे असेल, गर्भाशय मोठे असेल तर त्याचा दबाव वाढून, सोबत गाभण जनावरांना कोणत्याही प्रकारचा व्यायाम दिला नसेल तरी देखील मांयांग बाहेर पडू शकते.३) इतर कारणांमध्ये जनावर खूप अशक्त असेल, वयस्कर झाले असेल तसेच पूर्वी जनावर वेताना जर योनी मार्गामध्ये जखमा झाल्या असतील तरीसुद्धा मांयांग बाहेर येते. ४) शरीरातील कॅल्शियमची कमतरता हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. अनेक वेळा वैरण, पशुखाद्य मोठ्या प्रमाणामध्ये जर खायला दिले, पाणी पाजण्यात आले तर कोठी पोटाचा दाब गर्भाशयावर पडून मांयांग बाहेर येऊ शकते.५) गोठ्यामध्ये ज्यादा प्रमाणात उतार असल्यास देखील अनेक गाई म्हशीमध्ये आपल्याला मायांग बाहेर पडलेले आढळून येते. ऊर्जा व प्रथिने याची कमतरता हे देखील एक कारण आहे. सोबत हा प्रकार अनेक वेळा अनुवंशिक सुद्धा असू शकतो.
उपाययोजना१) हे सर्व टाळण्यासाठी आपल्या गोठ्यात असे जनावर जर असेल तर गाभण काळात च्या शेवटच्या टप्प्यात त्याचा मागील भाग उंचावर राहील याप्रमाणे बांधावे. जेणेकरून शरीरातील इतर अवयवाचा दाब गर्भाशयावर पडणार नाही.२) सोबत आहार देखील विभागून दिल्यास कोठी पोटाचा दाब गर्भाशयावर पडणार नाही.३) नियमित खनिज मिश्रणे दिल्यास मायांग बाहेर पडण्याचे प्रकार आपल्याला टाळता येतात.४) गोठ्यात एखाद्या जनावराचे मायांग बाहेर पडत असेल तर अशा जनावर कटाक्षाने लक्ष ठेवावे.५) रात्री अपरात्री जर बाहेर पडले आणि मायांगाला जखमा झाल्या तर पुढे खूप त्रास होतो.६) तज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार करून घेणे आवश्यक आहे. त्यांच्याकडूनच सदर मांयांग हे त्याच्या मूळ जागी बसून घ्यावे. ७) ज्या वेळी व्याल्यानंतर संपूर्ण गर्भाशय उलटे होऊन बाहेर पडते अशावेळी जनावर धडपडून त्याला जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी.८) डॉक्टर येण्यास थोडासा अवधी असेल तर बर्फाने किंवा पोटॅशियम परमॉग्नेटच्या सौम्य थंड पाण्याने गर्भाशय स्वच्छ करून घ्यावे.९) असे केल्यास गर्भाशयाची सूज कमी होऊन पशुवैद्यकांना योग्य पद्धतीने मूळ जागेवर त्याला व्यवस्थित बसवण्यासाठी मदत होऊ शकते.१०) डॉक्टरांच्या सल्ल्यानेच निरणाला टाके घालून घ्यावेत किंवा दोरीने बांधून घ्यावे.११) सोबत सलाईन, वेदनाशामक इंजेक्शन, प्रतिजैविके देऊन पुढे ते जनावर वेळेवर नियमित गाभण राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.
जाता जाता… अनेक पशुपालकांचा असा गोड गैरसमज आहे की मायांग बाहेर येणारी जनावरे ज्यादा दूध देतात. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
- डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: गाई-म्हशीमध्ये गर्भाशयाचा पीळ म्हणजे नक्की काय आणि हे कशामुळे होते वाचा सविस्तर