आजकाल प्रत्येक पशुपालकाच्या गोठ्यात प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. अनेक वेळा पशुवैद्यक येण्यापूर्वी आपण त्या पेटीतील औषधाचा वापर करून अनेक आजारांची तीव्रता कमी करू शकतो. होणारे नुकसान देखील टाळू शकतो.
पशुप्रथमोपचार पेटी ही लाकडी किंवा ॲल्युमिनियमची असावी. आज-काल प्लास्टिकच्या देखील वापरल्या जातात. त्यामध्ये साधारण अचानक जखमा झाल्या, भाजलं, खरचटलं, पोट फुगलं, पोट गच्च झालं, सूज आली अशावेळी त्याची तीव्रता पाहून आपण पशुवैद्यक येण्यापूर्वी प्रथमोपचार करू शकतो व जनावरांना होणाऱ्या वेदनांची तीव्रता कमी करू शकतो.
पशुप्रथमोपचार पेटीत काय असावे?१) टिंक्चर आयोडीनआपल्या पशुप्रथमोपचार पेटीत टिंक्चर आयोडीन जे जखमेतील रक्तस्राव थांबवू शकते. जखमेत होणारा रोगजंतूचा शिरकाव देखील थांबवता येतो. अनेक वेळा जनावर व्याल्यानंतर वासराच्या तुटलेल्या नाळेवर टिंक्चर आयोडीन लावून तो भाग निर्जंतुक करता येतो. टिंक्चर बेंजोईन हे आयोडीन पेक्षा चिकट असते. त्याचा वापर हाडावरील जखमा, खरचटणे यामुळे होणारा रक्तस्त्राव थांबवण्यास होऊ शकतो. जर शिंग मोडले खुराच्या मध्ये जखमा झाल्या तर त्याचा वापर करून रक्तस्राव कमी करता येतो.
२) पोटॅशियम परमॅग्नेटपोटॅशियम परमॅग्नेट या जांभळ्या रंगाचे खडे वापरून जंतुनाशक द्रावण तयार करता येते. त्याचा वापर जखमा साफ करणे, त्याचे खडे वापरून जखमेतील रक्तस्त्राव थांबवू शकतो. लाळ खुरकूत रोगांमध्ये तोंडातील, पायातील जखमा स्वच्छ करण्यासाठी सौम्य द्रावण करून वापरता येऊ शकते.
३) झिंक ऑक्साइडझिंक ऑक्साइड या पांढऱ्या रंगाची पावडर वापरून चिघळलेल्या जखमा बर्या करता येतात. जुनी जखम असेल विशेषतः कासेवर अशा जखमा असतात. ह्या जखमा पोटॅशियम परमॅग्नेटचे खडे घालून मलम करून वापरल्यास जखमा बऱ्या होण्यास मदत होते.
४) बोरिक पावडरबोरिक पावडर ही चकचकीत बारीक अशी पावडर खुरातील,कानातील जखमा बऱ्या करण्यासाठी वापरतात. डोळे आले, लाल झाले तर सौम्य प्रमाणात पाण्यात टाकून डोळे धुऊन घेता येतात.
५) टरपेंटाईन टरपेंटाईन हे उग्र वासाचे द्रावण आहे. त्याचा वापर जखमेतील किडे मारण्यासाठी फक्त होतो. ना की जखम बरे करण्यासाठी. जखमेवर टाकून जिवंत, मेलेल्या अळ्या काढून टाकाव्यात. झिंक ऑक्साईड पावडर लावून जखम बरी करून घ्यावी. अनेक वेळा रात्री अपरात्री पोट फुगल्यास एक लिटर गोडे तेलामध्ये २५ ते ३० मिली टरपेंटाइन मिसळून सावकाश पाजावे. रंगकाम करताना जे वापरतात ते न वापरता औषध दुकानातील टर्पेंटाइन वापरावे.
६) गंधक गंधक अनेक वेळा कातडीचे रोग बरे करण्यासाठी वापरतात. करंजी तेल, खोबरेल तेलातून केल्यास कातडीचे रोग बरे होतात.
यासह खाण्याचा सोडा, बँडेज पट्ट्या, एकादी कात्री, जखमेतील किडे काढण्याचा चिमटा जर उपलब्ध करून ठेवला तर आपण अचानकपणे उद्भवलेल्या बाबीवर पशुवैद्यक येण्यापूर्वी प्रथमोपचार करून त्याची तीव्रता कमी करू शकतो.
यासाठी फार मोठ्या प्रशिक्षणाची गरज नाही. ज्या ज्या वेळी आपण पशुवैद्यकीय दवाखान्यात जातो त्यावेळी थोडा वेळ थांबून निरीक्षण केल्यास या सर्व बाबी आपल्याला सहज करता येतात. गरज आहे ती इच्छाशक्तीची.
डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: जनावराने प्लास्टिक, लोखंडी वस्तू खाल्ल्या तर कसे ओळखाल? कशी दिसतात लक्षणे? वाचा सविस्तर