नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गऊळ येथील लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. कार्यालय स्थलांतरित झाल्यास तालुक्यातील लाल कंधारीचे संवर्धन आणि संशोधन कालबाह्य होणार आहे. त्यासाठी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी महसूल मंत्र्यांकडे स्थलांतर रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु शासनाने त्याबाबतचे परिपत्रक काढले नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागणार का? अशी अपेक्षा येथील पशुपालकांना लागली.
छत्रपती संभाजीनगर येथे १६ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय झाला आहे. लाल कंधारी गोवंश प्रजातीचे जतन व संवर्धन करण्यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे साकुड येथे पशुसंवर्धन विभागाची ८१ हेक्टर जमीन प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यादृष्टीने हालचालीही सुरू झाल्या होत्या. परंतु या निर्णयाला पशुपालकांचा विरोध होत होता, ही बाब खासदार चिखलीकर यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे मांडली. त्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन केंद्राच्या स्थलांतराला स्थगिती दिली असून, तसे निर्देश सहायक संचालकांना दिले आहेत; पण याबाबतचे असे कोणतेही शासनाचे परिपत्रक संबंधित कार्यालयास आले नसल्याचे कळाले.
लाल कंधारी व देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता
लाल कंधारी पशुधनाच्या संख्येत मोठी घट
२०१३ मध्ये केलेल्या जातनिहाय सर्वेक्षणानुसार लाल कंधारी गोवंशीय पशुधनाची संख्या १,२६.६०९ इतकी होती. सन २०१९च्या पशुगणनेत लाल कंधारी गोवंशीय पशुधनाची संख्या अनुक्रमे १,२३,९४३ इतकी आहे. सदर आकडेवारी विचारात घेता लाल कंधारी गोवंशीय पशुधनाच्या संख्येत विशेषतः देवणी प्रजातीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
सदर घटीचे प्रमाण विचारात घेता कालौघात सदर प्रजाती नामशेष होण्याची दाट शक्यता आहे. २०१९च्या पशुगणनेत लाल कंधारी संख्या ही बीड जिल्ह्यापेक्षा नांदेड जिल्ह्यात जास्त आहे. तरी येथे पूर्वीची मंजुरी असताना ही बीडमध्येच का? जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील प्रसिद्ध असलेले लाल कंधारी गोवंश वळू आणि गाईचे संवर्धन केंद्र कंधार तालुक्यातील गऊळ येथे १९८८ मध्ये सुरू करण्यात आले. लाल कंधारी वळू आणि गाईचे प्रजनन आणि संगोपन याच तालुक्यात मोठ्या प्रमाणात होते. शिवाय लाल कंधारीची सर्वाधिक संख्या कंधार तालुक्यातच आहे.