हिवाळ्यात शेळ्या आणि मेंढ्यांच्या देखभालीसाठी विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा थंडीमुळे शेळ्यांची लहान करडं दगावू शकतात. तसेच विविध आरोग्य समस्यांनाही तोंड द्यावे लागू शकते. अशा परिस्थितीत शेळ्या आणि मेंढ्यांच्या गोठ्याची योग्य काळजी घेणं त्यांना आरामदायक आणि सुरक्षित वातावरण देणं आवश्यक आहे.
गोठा ओलसर न ठेवता कोरडा आणि हवादार ठेवा
गोठा कोरडा आणि हवेशीर असावा, असं तज्ज्ञांचं मत आहे. गोठ्यात ओलावा जास्त टिकून राहिल्यास तापमान कमी होऊन रोगांचा फैलाव होऊ शकतो. ओलावा कमी करण्यासाठी गोठ्याच्या दिशेबाबत विशेष काळजी घ्या. गोठ्याची दिशा दक्षिण-उत्तर किंवा पूर्व-पश्चिम असावी, ज्यामुळे सकाळी आणि सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे ओलसरपणा कमी होतो.
स्वच्छ आणि उबदार बिछाना करडांच्या आरोग्यासाठी गरजेचा
गोठ्यातील जमिनीला मुरमा किंवा चुनखडी लावून ओलसरपणापासून संरक्षण करता येईल. तसेच, गोठ्याच्या आजुबाजूला मोकळी जागा ठेवून हवा खेळती राहील, ज्यामुळे शेळ्या आणि मेंढ्यांना चांगला वावर मिळतो. बिछान्याचा विशेष महत्त्व आहे, खासकरून लहान करडांसाठी. त्यांचा बिछाना मऊ, उबदार आणि स्वच्छ असावा. बिछान्याचं नियमितपणे २ ते ३ दिवसांनी बदल करणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे अमोनिया वायू निर्माण होण्यापासून वाचता येईल, जो करडांच्या श्वसनाशी संबंधित आजारांना जन्म देतो.
थंडीपासून बचाव करण्यासाठी घ्या विशेष काळजी
हिवाळ्यात करडं आणि कोकरांना थंडीपासून संरक्षण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर थंडी जास्त असेल, तर शेकोटी, विजेचा दिवा किंवा शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवावी. यामुळे करडांना न्यूमोनिया आणि इतर श्वसनविकारांपासून संरक्षण मिळेल. विजेच्या दिव्याला संरक्षक पिंजरा असावा आणि तो करडांपासून २० इंचांपेक्षा जास्त उंचीवर टांगावा, अशी सूचना तज्ज्ञ देतात.
स्वच्छ आणि कोमट पाणी तसेच योग्य आहाराची व्यवस्था देई उत्पन्नाची हमी
शेळ्या, मेंढ्यांना स्वच्छ आणि कोमट पाणी पिण्याची सोय असावी. यामुळे त्यांच्या मूत्रसंस्थेचं कार्य सुस्थितीत राहण्यास मदत होते. नवजात करडाला चीक दिल्यानं त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनसंस्थेचं कार्य सुरळीत राहते. चीक पाजल्यामुळे मरतुकीचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.
मुक्त संचार पद्धतीत बंदिस्त गोठ्याची आवश्यकताशेळ्या आणि मेंढ्यांना मुक्त संचार पद्धतीने संगोपन करत असाल, तर त्यांच्यासाठी एक बंद गोठा असावा, ज्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांना थंडीपासून संरक्षण मिळू शकते.
सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात मुक्त सोडणेसकाळच्या वेळी शेळ्या, मेंढ्यांना मोकळ्या जागेत सोडून त्यांना सूर्यप्रकाशाची उब मिळवून द्यावी. हिवाळ्यात सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे त्यांचा आरोग्यवर्धन होतो आणि त्यांच्या शरीरातील उष्णतेचा समतोल राखला जातो. वरील प्रमाणे सर्व उपाय योजना करत हिवाळ्यात शेळ्या आणि मेंढ्यांची योग्य काळजी घेतल्यास त्यांचं आरोग्य उत्तम राहील.