आता जिल्ह्यात यात्रा, उरूसाला सुरुवात झालीच आहे. त्यानिमित्ताने अनेक पशुप्रदर्शने भरवली जात आहेत. उत्कृष्ट जातीवंत जनावरांच्या निवड स्पर्धा घेतल्या जातात.
पशुपालकांनी वर्षभर जीवापाड जपलेल्या, खाऊ पिऊ घातलेल्या जातिवंत जनावरांना या प्रदर्शनामध्ये सादर करण्याची संधी मिळणार आहे.
आपण केलेल्या कष्टाचा चीज व्हावं, आपल्या जनावरांचे कौतुक व्हावं सोबत त्याचं विक्री मूल्य वाढावं असा त्यांचा प्रयत्न असतो.
पण या प्रयत्नांना जर शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळालं तर जास्तीत जास्त पशुपालक पूर्वतयारीने सहभागी होऊ शकतील त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न.
१) पशुपालकांनी जातिवंत जनावरे म्हणजे त्या जातीची संपूर्ण वैशिष्ट्ये असणारी जनावरे निवडावीत.२) त्यासाठी त्या जातीचा अभ्यास, पशुवैद्यक तज्ञाशी चर्चा करून जनावरांची निवड व खरेदी लहान वयात करून योग्य खुराक आणि तालीम दिली तर चांगले बांधेसूद आपण जनावर बनवू शकतो.३) जनावरांची वयानुसार योग्य वाढ झालेली असावी. देशी,संकरित कालवडी या योग्य वयाच्या असाव्यात.४) वय जास्त असेल आणि गाभण नसतील तर वांझ ठरवून स्पर्धेतून बाद होऊ शकतात.५) वळूच्या बाबतीत जाती वैशिष्ट्या बरोबर बांधेसूद बाणा, रगदार पुरुषी ठेवण असणे अत्यंत आवश्यक आहे. लठ्ठ वळू अपात्र ठरतात.६) त्याचबरोबर कोणतेही व्यंग, जखम, जातीपेक्षा वेगळा रंग असू नये.७) जनावरे मारकी, बुजरी अथवा भित्री असू नयेत. अद्याधारक असावीत. त्यासाठी प्रशिक्षण द्यावे.८) डोळे, डोके हे जाती वैशिष्ट्यानुसार असावीत. डोळे पाणीदार असावेत.९) गाईची मान लांब सडपातळ असावी.१०) वळू भरदार व रुबाबदार असावा. वशिंडाची वाढ वयानुसार सुदृढ असावी.११) गायीच्या बाबतीमध्ये कास ही भरदार असावी.१२) स्तन लाभ एकाच आकाराचे व निरोगी असावेत.१३) बरगड्या गोलाकार चपट्या आणि स्वतंत्र दिसल्या पाहिजेत.१४) नाकपुड्या रुंद ओलसर असाव्यात.१५) पाहताक्षणी इतर पशुपालक, निवड समितीच्या डोळ्यात भरेल.१६) प्रत्यक्ष प्रदर्शनादिवशी जनावराची शिंगे सौम्य सॅन्ड पेपरने घोळावीत. कोयता, चाकू याचा वापर करू नये. त्यावर तेलाचा हात फिरवावा.१७) खुर देखील नियमितपणे नालबंदा कडून रेखीव करून घ्यावेत. जनावर धुवून घ्यावे. जमल्यास पाण्यात किंचितसा नीळ घालावा.१८) ऊन, थंडीत जनावर बांधू नये. खरारा वापरून निर्जीव केस, कोंडा काढून टाकावेत. केसाच्या दिशेनेच हातोळी फिरवावी.१९) जनावर साबणाने धुवून घ्यावे. शेपूट गोंडा देखील स्वच्छ करून कंगव्याने विंचरून घ्यावा.२०) कंगवा तुरटीच्या पाण्यात बुडवून कोरडा करावा.२१) रिंगणात जनावर चालताना ऐटबाज दिसण्यासाठी वाळूतून चालवावे. जेणेकरून पाय उचलून चालायची सवय लागेल.२२) जनावर रिंगणात उतरवताना अंगावर झूल, शिंगात कंडे इतर सौंदर्य अलंकार असता कामा नयेत.२३) यात्रा समिती, पशुप्रदर्शन भरणाऱ्या मंडळींनी अशा स्पर्धेची प्रसिद्धी चांगली करावी. जेणेकरून जास्तीत जास्त पशुपालक आपल्या पशुधनासह हजर राहतील.२४) स्पर्धेतील बक्षीस रकमेपेक्षा सन्मान महत्त्वाचा असतो. त्यासाठी शक्यतो सर्व पशुपालकांना प्रवासाचा खर्च दिल्यास उत्तम.२५) संयोजकांनी जनावराची नोंदणी त्यांच्या गटानुसार बिनचूक करावी. वेळमर्यादा ठरवून द्यावी.२६) रिंगणात फक्त जनावरे, मालक, निवड समिती सदस्य यांचा वावर असावा.२७) संयोजकानी निवड समितीत आपले जास्तीत जास्त एक अथवा दोनच प्रतिनिधी द्यावेत.२८) निवड समितीला पूर्ण स्वातंत्र्य देऊन त्यांच्या निर्णय प्रक्रियेत कोणत्याही परिस्थितीत ढवळाढवळ करू नये.
पशुप्रदर्शनातुन चांगल्या जनावरांना एक प्रकारची समाज मान्यता सन्मान मिळत असतो. पशुपालक प्रेरणा घेत असतात. त्यातून जातिवंत जनावरांचे संवर्धन होते. त्यामुळे लोकांनी अशा प्रदर्शनाला भेट देऊन पशुपालकांचा उत्साह देखील वाढवावा इतकच.
डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: गाई व म्हैशीतील लाल लघवीचा आजार कशामुळे होतो? काय कराल उपाय?