शेती व्यवसायात यांत्रिकीकरण वाढल्याने पारंपरिक शेती मशागत लोप पावत चालली आहे. बैलजोडीऐवजी यंत्रांच्या साहाय्याने शेती कामे केली जात आहेत. त्यामुळे पशुपालन करण्याकडे पशुपालक पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. तसेच या जातीच्या जनावरांच्या जातीचे संगोपन व पैदास कशी करावी? याबाबतची माहिती मिळत नसल्याने आगामी काळात देवणी, लाल कंधारी या जातींचे वळू नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस हाळी हंडरगुळी येथील जनावरांचा बाजार चालतो. बाजारात देवणी, लाल कंधारी, खिल्लारी, संकरित, गावरान जातींची जनावरे मिळत असल्याने बाजारात राज्यासह परराज्यातील व्यापारी, पशुपालक बाजाराला प्राधान्य देतात. देवणी व लाल कंधारी जातींची वळू शेती कामासाठी दणकट व मजबूत असतात. शिवाय, दिसण्यासाठीही आकर्षक असतात. सध्या चांगल्या बैलजोडीची किंमत लाखाच्या घरात आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना या जातींची बैलजोडी खरेदी करणे आवाक्याच्या बाहेरचे झाले आहे.
पशुसंवर्धन केंद्र सुरू करण्याची मागणी...
जनांवरांची पैदास व संगोपन याबद्दलची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून मिळत नसल्याने पशुपालकांची हेळसांड होत आहे. ■ देवणी, लाल कंधारी व इतर जातींच्या जनावरांच्या संगोपनासाठी हाळी हंडरगुळी येथे पशुसंवर्धन व पैदास केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पशुपालकांतून आहे.
हाळी हंडरगुळी येथे जनावरांचा बाजार भरत असल्याने चिमाचीवाडी, मोरतळवाडी, वडगाव, शेळगाव, बोरगाव, वायगाव, रुद्रवाडी आदी गावांत पशुधन बऱ्यापैकी होते. मात्र, वर्षानुवर्षे पावसाचे प्रमाण कमी होत चालल्याने चारा व पाण्याची टंचाई भेडसावत असल्याने पशुधन कसे सांभाळायचे? असे चित्र आहे.