पावसाळ्यातील वाढलेली आर्द्रता आणि बदललेले हवामान हे जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. या काळात विविध प्रकारचे जिवाणू आणि विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे जनावरांमध्ये रोगांचा उद्रेक होतो, यामुळे दुग्ध उत्पादनात घट होते. जनावरांची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते.
रोगामुळे जनावरांच्या उपचारांसाठी वाढलेला खर्च आणि उत्पादन घट यामुळे पशुपालकांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यातील रोगापासून जनावरांना सुरक्षित ठेवणे हे पशुपालकांसाठी अत्यंत गरजेचे असते.
या आजारांचा धोका
१) घटसर्प
हा एक जिवाणूजन्य आजार असून, त्याला गळासूज असे म्हटले जाते. हा संसर्गिक आजार पाश्चुरेला मल्टोसीडा नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा आजार प्रामुख्याने गायी, म्हशीमध्ये दिसत असला तरी शेळ्या, मेंढ्या, डुकरांमध्येदेखील दिसून येतो. अचानक ताप, श्वास घेण्याचा त्रास, शरीराच्या भागांमध्ये सूज येते.
२) फऱ्या
जनावरांच्या आजारात टांगे आजार हा सुदृढ किंवा मासल पेशी जास्त असलेल्या जनावरांमध्ये दिसून येतो. म्हशीमध्ये फऱ्या आजाराचे प्रमाण कमी असते, हा आजार क्लोस्ट्रीडियम या जिवाणूमुळे होतो. मास पेशीमध्ये सूज, ताप, अशी लक्षणे दिसून येतात.
३) लम्पी स्किन डिसीज
हा गुरांमध्ये विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. गायींना ताप येणे, त्वचेवर फोड येणे, एकापेक्षा जास्त गाठी येणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आहे, या आजारामुळे गुरांच्या त्वचेला कायमस्वरूपी नुकसान होते.
४) लाळ्या खुरकत
संसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने हा आजार होतो याची लक्षणे म्हणजे जनावरांचे खाणे पिणे बंद होते. त्यांना ताप येतो. दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट होते. जनावरांच्या जिभेवर टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. खुरातील बेचकीमध्ये फोड येतात, अपंगत्व येते.
५) पेस्ट दे पेटी रूमिनंट्स
हा रोग शेळ्या, मेंढ्यांमधील अतिसंसर्गजन्य आहे. हा आजार मेंढ्यापेक्षा शेळ्यांमध्ये आणि पाच ते आठ महिने वयोगटाच्या करडामध्ये जास्त होतो. ताप, नाका तोंडातून स्राव येणे अशी लक्षणे दिसतात.
६) अंत्रविषार
हा रोग सर्व वयोगटांतील शेळ्यांना प्रभावित करतो. हा रोग जास्त प्रमाणात चरणाऱ्या शेळ्यांना नवजात आणि लहान मेंढ्या यांच्याशी जास्त संसर्गजन्य आहे. अतिसार, तोंडातून फेसयुक्त लाळ, अचानक मृत्यूही होतो.
काय काळजी घ्याल?
- पावसाळ्यामध्ये जनावरांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. अशक्त जनावरे आजारात लगेच बळी पडतात. त्यामुळे जनावरांना ठेवण्यात येणाऱ्या गोठ्यात स्वच्छता राखावी. - मलमूत्र वेळीच साफ करावे, साचलेले पाणी काढून टाकावे व परिसर स्वच्छ ठेवावा.
- जनावरांना चांगला आहार देणे व दूषित पाणी व खाद्यपदार्थ देणे टाळावे. उत्तम दर्जाचा खुराक व मिनरल मिक्स्चर देण्यात यावे.
- जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवताना अस्वस्थतेचे लक्षण दिसतात. त्वरित उपचार करून घ्यावे. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
- पावसाळ्यापूर्वी जनावरांना नियमित जंतनाशक औषध देणे, स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शनाखाली लसीकरण रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.
औषध, लसीकरण प्रथम प्राधान्याने करावे
शेतकरी आणि पशुपालकाने वरील उपाय अवलंबून आपल्या जनावरांना पावसाळ्यातील रोगापासून सुरक्षित ठेवावे. विशेषतः जंतुनाशक औषध व लसीकरण प्रथम प्राधान्य देऊन वेळोवेळी करून घ्यावे.