दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक होय. दिवाळी म्हटली की घरोघरी सजणारे आकाश कंदील, दीपमाळा, घरासमोरील रांगोळी, छोट्या-मोठ्या पणत्या व त्याचबरोबर घराघरात बनवला जाणारा चविष्ट फराळ आठवतो.
तसेच अंगाला तेल लावून आणि सुगंधी उटणे लावून केलेले दिवाळीचे अभ्यंग स्नान या सणाची रंगत अजूनच वाढवते. आजकाल बाजारात अनेक ठिकाणी उटणे विकत मिळते. पण त्यात नेमके कोणते घटक वापरले आहेत याची शंका मनात येतेच.
त्यापेक्षा घरी तयार केलेले आयुर्वेदिक उटणे आपल्या त्वचेसाठी सुरक्षित ठरू शकते. पण हे घरच्या घरी सोप्या पद्धतीने उटणे कसे बनवावे हे आज आपण जाणून घेऊया.
एक किलो उटणे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
संत्रा साल ५० ग्रॅम, लिंबू साल ५० ग्रॅम, मसूरडाळीचे पीठ १०० ग्रॅम, लोद्र पावडर १०० ग्रॅम, बावची बी १०० ग्रॅम, कापूर काचरी १०० ग्रॅम, आवळा पावडर ५० ग्रॅम, मुलतानी माती १०० ग्रॅम, गवला कचोरा १०० ग्रॅम, नागरमोथा ५० ग्रॅम, चंदन पावडर १०० ग्रॅम, कडुलिंब पावडर ५० ग्रॅम व आंबेहळद ५० ग्रॅम यांचा समावेश होतो.
हे सर्व साहित्य आपल्याला कोणत्याही मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होते. लिंबू साल व संत्रा साल यामध्ये अँटिऑक्सिडंट असल्याने त्वचा निरोगी व चमकदार राहते. लोद्र पावडरमुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.
बावची पावडरमुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. कापूर काचरी हे प्रामुख्याने उटण्यामध्ये आल्हाददायक सुगंध निर्माण करण्यासाठी वापरतात.
तसेच त्यामधील अँटिऑक्सिडंट त्वचा शुद्ध करण्यासाठी मदत करतात. आवळ्यापासून बनवलेली आवळा पावडर त्वचेला तजेलदारपणा आणि तारुण्य बहाल करते.
वर्षानुवर्षे आपण सर्वजण चेहऱ्यासाठी मुलतानी मातीचा लेप वापरत आलो आहोत. त्वचेवरील मृत पेशी काढून त्वचेला तजेला मिळवून देण्यासाठी मुलतानी मातीचा सौंदर्यप्रसाधनात वापर केला जातो.
गवला कचोरा त्वचेला योग्य पोषण देत त्वचेमध्ये मुलायमपणा आणतो आणि त्याच बरोबरीने त्वचेला ताकद देण्याचे कामही करतो. आजकाल अनेक ठिकाणी त्वचा साफ करण्यासाठी मसूरडाळीचे पीठ वापरण्याचा सल्ला दिला जातो.
नागरमोथ्यामध्ये क्लोरोजेनिक अॅसिड असते. त्याचा फायदा त्वचारोगाच्या गंभीर आणि दीर्घकाळपर्यंत चालणाऱ्या समस्यांवर होतो. शरीराला थंडावा देण्यासाठी वर्षानुवर्षे आपण चंदनाचा लेप वापरत आलो आहोत. शरीर ताजेतवाने होण्यासाठी चंदनाचा लेप अत्यंत गुणकारी ठरतो.
कडुलिंबाच्या पावडरीचे शक्तिशाली अँटी फंगल व बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म त्वचेच्या अनेक विकारांवर उपचार करण्यास मदत करतात. जखम बरी करण्यासाठी आंबेहळद वापरली जाते.
आंबे हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो व त्वचेला चकाकी येते. अशा या सर्व पावडरींना आपण व्यवस्थित बारीक चाळणीने चाळून मिक्स करून घ्यावे अशाप्रकारे आपले आयुर्वेदिक उटणे तयार होते.
दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी हे उपयोगी आहेच तसेच आपण बनवलेले घरगुती आयुर्वेदिक उटणे वर्षभर वापरले तर आपण आपली त्वचा सुंदर, मुलायम व निरोगी ठेवू शकतो.
प्रतिभा कोतवाल
प्राथमिक शिक्षिका, कणकवली शाळा