भारतात अनेक देशी गोवंश आढळतात. त्यामध्ये देवणी, गीर, खिलार, कपिला, लाल कंधारी, साहिवाल, थारपारकर, राठी, लाल सिंधी, डांगी अशा गोवंशाचा सामावेश आहे. पण लाल कंधारी हा देशी गोवंश मराठवाड्यातील कंधार या भागात आढळतो. या गाईचे मराठवाडा भागात विशेष महत्त्व आहे.
काय आहेत या गाईचे वैशिष्ट्ये?
ही गाय प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी वापरली जाते. या जातीचे बैल चपळ व ओढकामासाठी वापरले जातात. कोरड्या हवामानात आणि दुष्काळसदृश्य वातावरणात या गाईंची वाढ चांगल्या प्रकारे होते. या गाईंच्या दुधातील स्निग्धांश हा ३ ते ४.५ पर्यंत असतो. या गोवंशातील बैलांचा शेतीकामासाठी, वाहतुकीसाठी आणि बैलगाडा शर्यतीसाठी वापर केला जातो.
शारिरीक वैशिष्ट्ये
ही गाय संपूर्ण लाल रंगाची असून मस्तक मध्यम आकाराचे असतात. डोळे लांबट व काळे वशिंड असते. वशिंड आकर्षक असून जसे वय वाढेल तसा वशिंडाचा रंग काळसर होत जातो. कासेचा आकार गोलाकार आणि गुलाबी रंगाची चमकदार कातडी कासेला असते.
दुग्ध उत्पादन
या गाईंच्या एका वेताचे सरासरी दूध उत्पादन हे ६५० ते ११०० किलो एवढे असते. खाद्याच्या नियोजनानुसार दुधाच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. दूध उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या गाईंच्या यादीत लाल कंधारी गोवंशाचा सामावेश होतो.