राजाराम लोंढे
कोल्हापूर : दूध व्यवसायातून दर दहा दिवसांनी जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात ८३ कोटी ८० लाख रुपये जातात. दुधाच्या विक्रीतून हे पैसे मिळतात. त्याचबरोबर ‘गोकुळ’ने आता अनुदानावर गॅस प्लॅन्ट देण्यास सुरुवात केली आहे. दोन जनावरांच्या शेणातून महिन्याला दीड सिलिंडर गॅस त्या शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे इंधनावर होणारा पैसा वाचला असून, त्याचबरोबर या प्लॅन्टमधून बाहेर पडणारी स्लरीही ‘गोकुळ’ विकत घेत असल्याने शेतकऱ्यांचा आता दुहेरी फायदा झाला आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांत जिल्ह्यातील दूध व्यवसायात झपाट्याने वाढ होत दुप्पट संकलन झाले आहे. दूध उत्पादनात अहमदनगरनंतर कोल्हापूरचा क्रमांक लागतो. पण म्हशींच्या दूध उत्पादनात अजूनही कोल्हापूरच आघाडीवर आहे. भाजीपाला, उसासह इतर पिकांतून पदरात काहीच पडत नसल्याने शेतकरी दूध व्यवसायाकडे वळला आहे. म्हशीच्या दुधाचा सरासरी दर ५० रुपये, तर गायीचा ३७ रुपये दर आहे. पशू खाद्यासह वाळलेल्या वैरणीचे दर वाढले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण ‘गोकुळ’ सारख्या दूध संघाने पशुवैद्यकीय सेवा अगदी माफक दरात गोठ्यापर्यंत उपलब्ध करून दिली आहे. दुभती जनावरे खरेदीपासून प्रत्येक गोष्टीत अनुदान दिल्याने निश्चितच उसापेक्षा दुधाचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध व्यवसाय केला तर उसाच्या शेतीपेक्षा दूध व्यवसायातून निश्चितच चार पैसे चांगले मिळू शकतात.
अधिक वाचा: उसाच्या कोल्हापुरात दुध उत्पादन व्यवसाय सरस
त्यात आता ‘गोकुळ’ दूध संघाने आधुनिक पद्धतीचे बायोगॅस प्रकल्प शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना साधारणता महिन्याला दीड सिलिंडर गॅस मिळतो. त्यामुळे इंधनावर होणाऱ्या खर्चात बचत होते. या प्रकल्पातून बाहेर पडणारी स्लरी शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात पिकांना वापरली तरी चालते. नाही वापरली तरी ते ‘गोकुळ’ खरेदी करते. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी हा अशा प्रकारचा बायोगॅस प्रकल्प उभा केला असून, येत्या वर्षभरात किमान दहा हजारांपर्यंत ही संख्या नेण्याचा ‘गोकुळ’चा मानस आहे.
दुधाच्या बिलांवर लाखोंची उलाढाल
पूर्वी उसाच्या बिलांवर शेतकरी उलाढाल करायचा, पण आता वर्ष-दीड वर्षे उधारी थांबण्याच्या मानसिकतेत व्यापारी नसतो. दुधाचे बिल आल्यानंतर पैसे देतो म्हटल्यावर हवे तेवढे उधार दिले जाते. दूध व्यवसायामुळेच बाजारात शेतकऱ्यांची पत वाढली आहे.
दूध संस्थांकडून बिनव्याजी कर्ज
जिल्ह्यातील अनेक सक्षम दूध संस्था आपल्या दूध उत्पादकाला दुभती जनावरे खरेदीसाठी बिनव्याजी १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत कर्ज देतात.
जिल्ह्याचे दूध व उसाचे अर्थकारण असे
व्यवसाय | उत्पादन | मिळणारे पैसे | कालावधी |
ऊस | १.४० काेटी टन (सरासरी २८५० रुपये दर) | ३९९० कोटी | १२ ते १८ महिने |
दूध | वार्षिक ७१.१७ कोटी लिटर (सरासरी दर ४३ रुपये) | ३०६० कोटी | प्रत्येक दहा दिवसांना |
दूध फरक | (दूध संघाकडून प्रतिलिटर १.८०, तर संस्थांकडून २ रुपये) | २७०.४४ कोटी | १२ महिन्यांनंतर |