सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ५८ ठिकाणी चेकपोस्ट तैनात केले असून, या ठिकाणी निवडणूक कर्मचारी कार्यरत असतील. तसेच सीमावर्ती भागातून चारा विक्रीसाठी परजिल्ह्यात जाऊ नये, यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी याच ठिकाणी तैनात असणार आहेत.
जिल्ह्यात चाराबंदी करण्यात आली असून विक्रीच्या उद्देशाने परजिल्ह्यात वाहतूक केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
प्रत्येक चेकपोस्टवर सीसीटीव्ही असणार आहेत. चारा वाहतूक रोखण्यासाठी निवडणूक संपल्यानंतरही चेक पोस्टवर कर्मचारी तैनात असतील, अशीही माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. संभाव्य पाणी टंचाई व चारा टंचाई संदर्भात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी अमत नाटेकर नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार उपस्थित होते.
चारा निर्मितीसाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना साडेतीन कोटींचे बियाणे मोफत वाटप केले आहे. त्यातून शेतकऱ्यांनी चारा तयार केला आहे. तसेच मूरघाससाठी दोन कोटींचे अनुदानही देण्यात येणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात १२ लाख पशुधन
सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील ४० तालुक्यांत व १०२१ महसूल मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे. यात माढा, सांगोला, माळशिरस, मोहोळ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. बाकीच्या तालुक्यातही चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात १२ लाख ४१ हजार ५८ पशुधन असून ३ जूनअखेर पुरेल इतका चारा सध्या उपलब्ध आहे.