मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव असताना त्यांनी या विभागाची पुनर्रचना करण्यासाठी एक धोरण तयार केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत कुठलाही बदल न करता ते मंजूर करण्यात आले. मुंढे यांच्या वारंवार बदल्या केल्या जातात आणि त्यावर चर्चादेखील होत असते.
पण पशुसंवर्धन विभागात अल्पकाळ असतानाही त्यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकासात आमूलाग्र बदल सुचविणारे धोरण तयार केले. विभागाची केवळ पुनर्रचनाच न करता दूध उत्पादक, पशुपालकांची समृद्धी कशी होईल, यावर फोकस करत हे धोरण त्यांनी बनविले.
४,५८६ पशुवैद्यकीय संस्थांना पशुवैद्यकीय चिकित्सालय संबोधले जाईल. श्रेणी दोनचे दवाखाने श्रेणी एकचे होतील.
मंत्रिमंडळाने स्वीकारलेल्या मुंढेंच्या प्रस्तावात नेमके काय आहे?
■ पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून दोन्ही विभाग एकत्र करणार. त्यामुळे प्रशासन प्रभावी बनेल.
■ विभागाचे नाव पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग असे असेल.
■ पशु व पशुजन्य उत्पादकतेत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. राज्याच्या सकल उत्पन्नात मोलाची भर पडेल.
■ पशुपालनाऐवजी पशू उद्योजकता ही संकल्पना विकसित करणार.
■ विभागात १५,५५२ इतकी पदे असतील. ७,२५६ पदे नव्याने भरणार.
■ ३५१ तालुक्यांमध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयांची निर्मिती.
■ ३१७ तालुक्यांमध्ये तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय सुरू केले जातील.
■ पशुसंवर्धन, दुग्धविकासाशी संबंधित सर्व विषय (उत्पादन ते विक्री) एका छताखाली आणाणार.
■ दुध उत्पादकांच्या उत्पादनांची विक्री करणारी प्रभावी यंत्रणा तयार करणार. पशुंच्या आरोग्याची काळजी या विषयावर फोकस.
■ कालबाह्य झालेली बरीच पदे रद्द करणार, काळाच्या गरजेनुसार आवश्यक असलेली कौशल्यपदे निर्माण करणार.
■ पशुंवरील उपचारासाठी तालुका पातळीपर्यंत अत्याधुनिक यंत्रणा बसविणार. दूध उत्पादन वाढीसाठी प्रभावी उपाययोजना. दूध उत्पादनात जगाशी स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण केली जाईल.