मुंबई : राज्याची सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
त्या दृष्टीने राज्यातील सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाने क्यूआर कोडेड आधार कार्ड जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिले आहेत.
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच ससून डॉकला भेट दिली होती. त्यावेळी बहुसंख्य खलाशांकडे आधार कार्ड नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती.
त्यावेळी मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांकडे आधार कार्ड असणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय इंडियन मर्चट शिपिंग कायदा आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार, मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेवर कायम स्वरूपी दिसेल, असे रंगविणे आवश्यक आहे.
नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूने स्पष्टपणे दिसेल, तसेच नौकेच्या केबिनच्या छतावर कोरून रंगविणे बंधनकारक असणार आहे.
याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतरच नौकांच्या मासेमारी परवान्यांचे नूतनीकरण आणि मासेमारी टोकन निर्गमित करण्यात येणार आहे, तसेच ही कार्यवाही न करणाऱ्या नौकांच्या मालकांवर परवाना अटी-शर्ती भंग म्हणून मासेमारी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
अधिक वाचा: नारळ पिकातील गेंड्या भुंगा व इरीओफाईड कोळीचे कसे कराल नियंत्रण?