सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : दक्षिण अमेरिकेत अधिवास असणारा सकर मासा येथील कासारी नदीत मासेमारीच्या जाळ्यात सापडला. भारतीय वंशाच्या माशांवर हल्ला करून उपजीविका करणारा हा मासा खाण्यासाठी अयोग्य आहे. यापूर्वी उजनी धरण व कृष्णा नदीत या माशाचे अस्तित्व आढळले होते.
येथील सुनील जाधव, अनिल जाधव व कृष्णात सातपुते यांना मासेमारी करताना जाळ्यात हा मासा सापडला. त्याच्याबाबत काहीच माहीत नसल्याने त्यांनी तो पाण्याच्या टाकीत सुरक्षित ठेवला आहे. दक्षिण अमेरिकेतील फिश टँकमध्ये शोभिवंत म्हणून या माशाला ठेवले जाते.
कालांतराने त्याच्या आकारामुळे त्याला सांभाळणे शक्य नसल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात पाण्यामध्ये सोडतात. त्यामुळे तेथील अधिवासाला धोका उद्भवतो. कारण, हा मासा त्या अधिवासात सापडणाऱ्या प्रदेशनिष्ठ माशांची अंडी व त्यांच्या पिलांना भक्ष्य बनवितो.
भारतातील अनेक जलाशयांमध्ये आहे. यांच्यामुळे तेथील जलसंपदा नष्ट होत आहे. कठोर कवचांनी बनलेल्या शरीरयष्टीमुळे हा मासा खात नाहीत. त्यांचा आकार वाढल्यावर ते नद्या, तलावांत सोडल्याने मत्स्य प्रजातींसाठी बाधक ठरत आहे.
याच प्रकारचा जेवणात वापरला जाणारा तिलाप मासा आफ्रिकेतून हौसेपोटी आणला गेला. चांगल्या चवीमुळे लोकांनी त्याला स्वीकारले. हा मासा देशी माशांना भक्ष्य बनवून जगतो. त्यांची प्रजात वाढताना दिसत आहे. विदेशी मासे टाळल्यास आपली जैवविविधता अबाधित राहील.
भारतीय वंशाच्या माशांना घातक ठरणाऱ्या परदेशी माशांच्या जातींची माहिती प्रसारित केली पाहिजे. तिलाप जातीच्या माशाची शेती संवेदनशील क्षेत्रातील पाण्याच्या साठ्यांमध्ये करण्यास बंदी आणावी. त्यामुळे प्रदेशनिष्ठ माशांच्या जातींचे अस्तित्व संपणार नाही. - अभिषेक शिर्के, प्राणिशास्त्र विद्यार्थी (मत्स्य निरीक्षक)
अधिक वाचा: Fishery गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करताय; कोणत्या जातीचे मासे आणाल?