Join us

अतिरिक्त मासेमारीवर येणार रोख; माशांसाठी समुद्रतळाशी कृत्रिम अधिवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 4:12 PM

समुद्रातील मत्स्य संपत्ती वाचणे ही भविष्य काळासाठी गरजेची आहे. रायगड जिल्ह्यातही मासे मिळणे कमी झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन, मत्स्य संवर्धनासाठी रायगडच्या अलिबाग, श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यातील समुद्रात ४५ ठिकाणी कृत्रिम भित्तीकांची उभारणी केली जात आहे.

राजेश भोस्तेकरअलिबाग : समुद्रातील मत्स्य संपत्ती वाचणे ही भविष्य काळासाठी गरजेची आहे. रायगड जिल्ह्यातही मासे मिळणे कमी झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन, मत्स्य संवर्धनासाठी रायगडच्याअलिबाग, श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यातील समुद्रात ४५ ठिकाणी कृत्रिम भित्तीकांची उभारणी केली जात आहे.

समुद्राच्या तळाशी शास्त्रोक्त पद्धतीने या भित्तिका उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. समुद्रात मत्स्य उत्पादनातून शासनाला करोडोचा महसूल प्राप्त होत असतो. मात्र, समुद्रात पर्ससीन, एलईडी या अनधिकृत मार्गाने मासेमारी करून मत्स्य संपदेला हानी पोहोचत आहे. त्यातच या वारेमाप मासेमारीने अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

रायगड म्हटलं की विस्तीर्ण समुद्र किनारा आणि ताजी मासळी डोळ्यासमोर येते. जिल्ह्यात पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांना ताजी मासळी खाण्यास मिळत आहे. मात्र, सध्या समुद्रात मासे मिळणे कमी झाले आहे.

प्रदूषण, हवामान बदल ही कारणे जरी असली तरी मुख्य कारण म्हणजे वारेमाप होणारी मासेमारी. पूर्वी पारंपरिक पद्धतीने म्हणजे जाळी टाकून मासेमारी केली जात होती. मात्र, आतापर्ससीन आणि एलईडी या आधुनिक पद्धतीने मासेमारी केली जात आहे.

या मासेमारीमध्ये मोठ्या मासळीसह त्याची पिल्लेही जाळ्यात येत आहेत. त्यामुळे मासेमारीमध्ये हळूहळू घट होऊ लागली आहे. याचा फटका हा मासे उत्पादनावर आणि व्यवसाय करणाऱ्यांना ही बसू लागला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्य काळात मासे मिळणे दुरापस्त होणार आहे. त्यामुळे मत्स्य संपदा वाचविणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.

यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने समुद्रात माशांसाठी कृत्रिम अधिवास निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत कोकणसह रायगड किनारपट्टीवर मत्स्य संवर्धनासाठी कृत्रिम भित्तीका उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

अशी उभारण्यात येत आहे भित्तिका- समुद्राच्या तळाशी २० मीटर १ खोलीवर दोन हजार स्वेअर मीटरच्या भित्तीका उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. विशिष्ट रचनेत उभ्या आडव्या संरचनेत या भित्तीका पसरविल्या जाणार आहेत.यामुळे समुद्राच्या तळाची मत्स्य संवर्धनासाठी कृत्रिम अधिवास तयार होण्यास मदत होणार आहे. कर्नाटक येथून या कृत्रिम भित्तीका बनवून आणून त्या समुदाच्या तळाशी उभारल्या जात आहेत.- यामुळे माशांना अधिवास तयार होऊन प्रजनन करण्यास जागा उपलब्ध होणार आहे. या कृत्रिम भित्तिकामुळे अतिरिक्त्त मासेमारी करण्यावरही रोख येणार आहे.

मत्स्य उत्पादन वाढीसाठी फायदाउभारल्या जात या प्रयोगामुळे माशांचे संवर्धन, तसेच उत्पादन वाढीसाठी फायदा होणार आहे. या भित्तीकामुळे नष्ट होत असलेल्या प्रजातीही पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

श्रीवर्धन, मुरुडमधील काम अंतिम टप्यात• रायगड जिल्ह्यात अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यात समुदात कृत्रिम भित्तीका उभारणीचे काम सध्या सुरू आहे.• तीन तालुक्यातील २० गावांजवळील ४५ ठिकाणे भित्तीका उभारल्या जाणार आहेत.• श्रीवर्धन आणि मुरुडमधील काम अंतिम टप्यात असून, त्यानंतर अलिबाग तालुक्यातील काम हाती घेतले जाणार आहे.• या प्रकल्पामुळे किनारपट्टीवर मत्स्य उत्पादन वाढीस मोठी मदत होणार आहे.

टॅग्स :मच्छीमारअलिबागरायगडकोकण