रत्नागिरी: मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीचे संकट जिल्ह्यातील मच्छीमारांवर कोसळत आहे. येत्या दोन दिवसांत dana cyclone वादळीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्ह्यातील मच्छीमार चिंताग्रस्त झाला आहे.
मागील वर्षी मासेमारी बंदीचा कालावधी ३१ जुलै रोजी संपल्यानंतर १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच वादळी हवामानाने खोल समुद्रातील मासेमारीला खो घातला होता.
त्यातच अतिवृष्टी आणि वादळाचे शुक्लकाष्ठ मच्छीमारांच्या मागे लागले ते आजतागायत संपलेले नाही. त्यामुळे ऑगस्टपासून २२ ऑक्टोबरपर्यंतचा मासेमारीचा काळ अक्षरशः वाया गेला आहे. यामध्ये मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मासेमारीसाठी खोल समुद्रात जाताना मच्छीमारांना एका फेरीकरिता डिझेल, बर्फ, रेशन आणि खलाशांचे वेतन आदीसाठी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो. त्यातच सध्या प्रमाणावर मासळी जाळ्यात लागते.
त्यातच कमी प्रतीचे मासे मिळत असल्याने सध्या मच्छीमारांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. दरम्यान, पुढील दोन दिवसांमध्ये वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असाच इशारा देण्यात आला आहे. सततच्या वादळीसदृश परिस्थितीमुळे आधीच मच्छीमार मेटाकुटीला आलेले असताना अचानक वादळ निर्माण होण्याच्या शक्यतेने मच्छीमार धास्तावले आहेत.
आधीच हा व्यवसाय नुकसानात सुरू असताना पुन्हा मासेमारी नौका नांगरावर ठेवून त्यांना न परवडणारे असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले.
मासेमारीसाठी अपुरा वेळदरवर्षी मच्छीमार मासेमारीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात मासेमारी करतात. त्यांनी पकडून आणलेल्या मासळीला विविध ठिकाणच्या बाजारपेठेत, हॉटेल व इतर ठिकाणच्या बाजारात मोठी मागणी असते. परंतु यंदाच्या वर्षी मासेमारीसाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याने बाजारात येणाऱ्या विविध प्रजातींच्या मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे खवय्ये मंडळीही निराश झाली आहेत.