उरण : वाढलेला उष्मा आणि विविध बंदरांतील मासेमारी बोटींची संख्या अचानक वाढल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या बर्फाचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे मात्र मच्छीमार बेजार झाले आहेत.
करंजा, ससून डॉक, मोरा, कसारा आणि इतर अनेक बंदरांतून दररोज मासेमारीसाठी सुमारे ५०० ते ६०० बोटी रवाना होतात.
खोल समुद्रातील मासेमारीसाठी बोटींना ८ ते १२ दिवसांचा कालावधी पकडलेली मासळी ताजी, सुरक्षित ठेवण्यासाठी सध्या बर्फाचा तुटवडा होत आहे.
एका मासेमारी बोटीला एका ट्रिपसाठी १० ते १२ टन बर्फाची गरज भासते. २२०० रुपये प्रति टन दराने मच्छीमारांकडून बर्फ खरेदी केले जाते. मुंबई, नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रातून मच्छीमारांना मागणीप्रमाणे बर्फाचा पुरवठा केला जातो.
मात्र, काही दिवसांपासून करंजा, ससून डॉक, मोरा, कसारा आणि इतर अनेक बंदरांतून मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींची संख्या अचानक वाढली आहे. परिणामी मासळीसाठी बर्फाचीही मागणी वाढू लागली आहे.
कसारा बंदरात बोटींच्या संख्येत वाढ
कसारा बंदरातच ३५०-४०० मच्छीमार बोटींच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मच्छीमारांची बर्फाची मागणीही वाढतच चालली आहे. करंजा, ससून डॉक, मोरा, कसारा आणि इतर विविध मच्छीमार बंदरात दररोज ५०० ते ६०० मच्छीमार बोटी मासेमारीसाठी रवाना होतात.
'या' कारणांमुळे येतेय मर्यादा
■ बंदरात अचानक मासेमारी बोटींची संख्या वाढल्याने बर्फाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
■ उष्माही वाढत चालल्याने आईस्क्रीम, शीतपेये, सरबतांसाठी बर्फाची मागणीही वाढतच चालली असल्याने बर्फपुरवठ्यावर मर्यादा आल्या असल्याचे बर्फ पुरवठादारांकडून सांगितले जात आहे.
■ परिणामी मच्छीमारांना मासेमारीला जाण्यासाठी मागणीनंतरही वेळेत बर्फ मिळत नसल्याने मच्छीमार मात्र बेजार झाले आहेत.
दररोज ८०० टन आवश्यकता
■ बर्फाच्या तुटवड्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत. बर्फ पुरवठादार कंपन्याही आर्थिक फायद्यासाठी जादा पैसे देणाऱ्यांनाच अधिक प्राधान्य देत आहेत.
■ वाढत्या महागाईमुळे मच्छीमारांना बफासाठी जादा पैसे देणे अवघड बनले आहे. त्याचा विपरीत परिणाम मच्छीमारांच्या व्यवसायावर होऊ लागला आहे.
■ दररोज विविध बंदरांतील मच्छीमारांना सुमारे ८०० टन बर्फाची गरज भासते.
■ बर्फाच्या व्यावसायिकांमध्ये दररोज दीड ते पावणेदोन कोटी रुपयांची उलाढाल होत असते, अशी माहिती पर्ससीन नेट फिशिंग असोसिएशनचे संचालक व्यावसायिक रमेश नाखवा यांनी 'लोकमत'ला दिली.