हितेन नाईकपालघर : पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस आणि ४५ ते ६० तास प्रतिवेगाने वारे वाहणार असल्याने हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला आहे.
पालघर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा दिला असला तरी बुधवारपासून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या जिल्ह्यातील सुमारे दोन हजार बोटींवरील मच्छीमार बांधवांची चिंता त्यांच्या कुटुंबीयांना सतावत आहे.
या सर्व बोटींना समुद्रातून पुन्हा माघारी किनाऱ्यावर बोलविण्याच्या सूचना भारतीय तटरक्षक दल, डहाणू विभागाचे अधिकारी एस. के. सुमन यांनी मत्स्यव्यवसाय विभाग आणि संबंधित सहकारी संस्थांना दिल्या आहेत.
सुरुवातीला त्या बोटींचा संपर्क होत नव्हता; परंतु आता बोटी पुन्हा हळूहळू किनाऱ्याकडे परतू लागल्या आहेत. राज्याच्या किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने सौराष्ट्र किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता.
तर कोकणात २३ ते २६ ऑगस्टदरम्यान गुजरातसह महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यांचा इशारा दिला होता. हा अंदाज खरा ठरत शनिवारी सकाळपासून पालघर जिल्ह्याच्या ११२ किमी किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
वसई, नायगाव, उत्तन, अर्नाळा, एडवन, केळवे, माहीम, वडराई, सातपाटी, मुरबे, नवापूर, दांडी, डहाणू, झाई-बोर्डी या भागातील सुमारे दोन हजार बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असून, त्या बोटी गुजरात, मुंबई, रायगड, रत्नागिरी या क्षेत्रात ३० ते ५० नोटिकल क्षेत्रात खोल भागात मच्छीमारीसाठी जातात.
भारतीय तटरक्षक दल, डहाणू विभागाचे अधिकारी एस. के. सुमन यांनी शुक्रवारी मत्स्यव्यवसाय विभाग आणि संबंधित सहकारी संस्थांना पाठविलेल्या आदेशात समुद्रातील सर्व बोटींना तत्काळ किनाऱ्यावर माघारी येण्याच्या सूचना देण्याचे आदेश दिले. सुरुवातीला या बोटींशी संपर्क होत नव्हता. मात्र, शनिवार सायंकाळपासून बोटी हळूहळू किनाऱ्याच्या दिशेने परतताना दिसत आहेत.
कर्ज चुकवायचे कसे?• १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली असली तरी पालघर, ठाणे जिल्ह्यांतील सर्व मच्छीमारांनी समुद्रात पाऊस पडत असल्याने १५ ऑगस्टपासूनच मासेमारीला जाण्याचा निर्णय घेतला होता.• १५ ऑगस्टनंतर मासेमारीला जाऊन एक ट्रिप घेऊन येत नाहीत, तोपर्यंत पुन्हा वादळी पाऊस सुरु झाला, त्यामुळे सहकारी संस्था, खासगी बँका, सावकार यांकडून घेतलेले कर्ज चुकवायचे कसे? या विवंचेत मच्छीमार सापडला आहे. वातावरण खराब असले तरी मच्छीमार नांगर समुद्रात टाकून स्थिर राहणे पसंत करतात. शेकडो लिटर्स डिझेल खर्च करून रिकाम्या हाताने माघारी फिरणे त्यांना परवडणारे नसते.