यंदा निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा न वाढल्याने मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. मासेमारी करणाऱ्या बांधवांनी या कठीण काळात देखील जिद्द न सोडता टरबूज अर्थात कलिंगड लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. यंदा पाणी कमी असल्याने टरबुजास चांगला दर मिळेल अशी त्यांना आशा आहे.
परतूर तालुक्याला निम्न प्रकल्प हा सिंचन पिण्याचे पाणी व मासेमारीसाठी वरदान ठरला आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले आहे. तसेच दरवर्षी होणारे मासेमारी बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबले आहे.
धरणात मत्स्यबीज सोडून मासेमारी बांधव आपली उपजीविका भागवितात. मात्र मागील वर्षी पाऊस न झाल्याने प्रकल्पात केवळ १८.५९ टक्के जिवंत पाणी साठा राहिला आहे. धरणात पाणी नसल्याने मच्छीमारी व्यवसाय करणे अडचणीचे बनले आहे. धरणात पाणी नसल्याचा परिणाम शेतकऱ्यांसह मच्छीमारावर ही होत असल्याने पर्यायी रोजगार शोधण्याची वेळ यावर्षी त्यांच्यावर आली आहे. मच्छीमार कलिंगड लागवडीकडे वळल्यामुळे त्यांना दुष्काळी परिस्थितीत देखील रोजगार शोधला आहे. यंदा मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने कलिंगड लागवडीत देखील घट होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कलिंगडाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
उपासमारीची वेळ
सध्या धरणात पाणी नसल्याने अहोरात्र पाण्यात फिरून ही मासे सापडत मिळत नाही. यामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न आमच्या समोर आहे. शासनाने मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना मदत करावी. - तुकाराम बलिये, मच्छीमार.
पाणी नसल्याने सोसायटी अडचणीत
मागील दोन वर्षापासून आमची सोसायटी आर्थिक अडचणीत आली आहे. मागील वर्षी अवकाळी पावसाने टाकलेले कोट्यवधीचे मत्स्यबीज वाहून गेले, तर यावर्षीही लाखो रुपयाचे टाकले आहे, मात्र धरणात पाणी नसल्याने हे बीजही वाया जाणार आहे. शासनाने या मच्छीमार सोसायटीस मदत करून रोजगाराचा प्रश्न सोडवावा. - निवृती लिंबुरे, मच्छीमार सोयायटी, चेअरमन