कोकणातील कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचे पारंपरिक बंदर, अशी दापोली तालुक्यातील हर्णे बंदराची ओळख आहे. मात्र, अलीकडे या बंदराला उतरती कळा लागली आहे. येथे दिवसाला कोट्यवधी रुपयांची होणारी उलाढाल आता मंदावली दिसते.
समुद्रातील तांत्रिक मासेमारी, समुद्रातील नैसर्गिक बदल, प्रजनन कालावधीत होणारी मासेमारी, तसेच माशांची वाढ न होऊ देणे, अशा अनेक समस्यांमुळे मत्स्यसाठा संपुष्टात येत आहे. त्यामुळे पारंपरिक हर्णे बंदरातील मच्छीमारांना मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
डिझेल व खलाशांचा खर्च परवडत नसल्याने अनेक मासेमारी नौका किनाऱ्यावरच आहेत, त्यातच वारंवार येणारे वादळ, समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थिती या सगळ्यांचा परिणाम मासेमारीवर होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचे बंदर अशी ओळख असलेल्या हर्णे बंदरात सुमारे दीडशे नौका मासेमारी करतात. रोज सकाळी व सायंकाळी माशांचा लिलाव होतो. यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
मासेमारीवर अवलंबून असलेल्या शेकडो हातांना रोजगार मिळतो. यातील उलाढालीवर हजारो कुटुंबीय अवलंबून आहेत. या बंदरातून मासेमारी व्यवसायातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत आहे. त्यामुळे मासे खरेदी-विक्रीसाठी येथे अनेक कंपन्या हजेरी लावतात.
हर्णे बंदरात गेली अनेक वर्षे माशांचा लिलाव होतो. या लिलावाला सुद्धा उतरती कळा लागली आहे. मासेमारी नौका वारंवार किनाऱ्यावरच असल्याने त्याचा लिलावावर मोठा परिणाम होत आहे. तसेच, पारंपरिक मासेमारीलाही उतरती कळा लागली.
आहे. कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या या बंदराच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एकेकाळी गजबजणारे हर्णे बंदर हळूहळू ओस पडू लागले आहे. पुनर्बांधणीकडे वेळीच लक्ष न दिल्यास हे बंदर इतिहास जमा होईल.
कर्ज काढून बोटींची बांधणी
बोटी बांधण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले जाते. कर्जाच्या पैशांतूनच मासेमारी बोटींची बांधणी केली जाते. परंतु, मासेमारी हंगाम आल्याने बोटीचे कर्ज फेडणे सुद्धा अवघड झाले आहे. तसेच, अनेक मच्छीमारांना आता उपासमारीसारख्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
पारंपरिक मच्छीमार डबघाईला आला असून, डिझेलचा खर्चही निघत नाही. मासेमारी करून आल्यावर डिझेलचा खर्च, तसेच खलाशांचा पगार याची जुळवाजुळव होत नाही. त्यामुळे मच्छीमार बांधवांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मच्छीमारांसाठी शासनाने ठोस निर्णय घेऊन त्यांना आधार देणे गरजेचे आहे. - पांडू पावशे, मच्छीमार नेते
शासनाचे अधिकारी नियम धाब्यावर बसवत असल्याने तांत्रिक मासेमारी सुरू आहे. समुद्रातील तांत्रिक मासेमारी मुळेच माशांचा साठा कमी झाला आहे. अलीकडे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हे असेचे सुरू राहिले, तर हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद होईल. - नंदू चौगुले, अध्यक्ष, हर्णे मच्छीमार सोसायटी
शासनाने मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जमाफी द्यावी. तसेच, मच्छीमारांसाठी पॅकेज जाहीर करावे, तरच, मच्छीमार बांधवांना दिलासा मिळेल, अन्यथा मच्छीमार बांधवांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. याचा शासनाकडून विचार व्हावा. - बाळकृष्ण पावशे, अध्यक्ष, बंदर कमिटी
हर्णे बंदरातील परिस्थिती बदलायची असेल, तर शाश्वत मासेमारी हा एकमेव पर्याय असू शकतो, त्यादृष्टीने मच्छीमारांची मानसिकता बदलण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर याठिकाणी पुरेशा सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. - अस्लम अकबानी, मच्छी व्यावसायिक
'शाश्वत मासेमारी' एकमेव पर्याय
समुद्रातील मत्स्यसाठा कमी होण्याला तांत्रिक मासेमारी हे एक मूळ कारण असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु, यावर शासनाचा निर्बंध नसल्याने सरसकट मासेमारी केली जात आहे. शासनाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसून होत असलेल्या मासेमारीमुळे हा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. यातून तोडगा काढायचा असल्यास शाश्वत मासेमारी हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी मच्छीमारांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
- शिवाजी गोरे
दापोली